ऐतिहासिक अवमूल्यन गाठल्यानंतर तेल विपणन कंपन्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली डॉलर खरेदीची विशेष व्यवस्था रुपया बराच सावरला असला तरी तूर्त कायम राहणार असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी स्पष्ट केले. यातून दिवसभरात डॉलरमागे ६१च्या गेलेला रुपया सावरून दोन महिन्यांच्या भक्कमतेवर पोहोचला.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेने ही स्वतंत्र खिडकी सुरू केली. कच्च्या तेलाच्या आयातीसाठी देशातील तेल कंपन्याना लागणाऱ्या अमेरिकन डॉलरची या खिडकीद्वारेच खरेदी होत आहे. याद्वारे प्रत्यक्ष रुपयाला स्थिरता देणारा परिणामही दिसून आला आहे. ही व्यवस्था सुरू करण्यापूर्वी रुपयाने ऑगस्टअखेर ६९ पर्यंतचा तळ गाठला होता. तथापि गेल्या काही दिवसांपासून त्यात सुधार येत असून चलन आता ६१ पर्यंत स्थिरावले आहे.
ही व्यवस्था विद्यमान स्थितीत कायम ठेवण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले. ती बंद करण्यात येत असल्याच्या वावडय़ा चलन बाजारात उठल्या होत्या. दुपारीच मध्यवर्ती बँकेने याबाबत स्पष्टीकरण दिले. या यंत्रणेतून अद्यापही तेल कंपन्या त्यांना लागणारे परकी चलन घेऊ शकतात; ही व्यवस्था बंद करण्यात आली नसून तशी पूर्वकल्पना त्यांना आधी दिली जाईल, असेही बँकेने म्हटले.
देशातील तीन प्रमुख सार्वजनिक तेल व वायू विपणन कंपन्यांना दिवसाला ४० कोटी डॉलरची गरज भासते. या माध्यमातून त्या महिन्याला ९ अब्ज डॉलपर्यंत रक्कम कच्चे तेल आयातीपोटी मोजतात. डॉलरची मागणी नोंदविणाऱ्यांमध्ये तेल कंपन्या या मोठय़ा ग्राहक आहेत. यानंतर अन्य आयातदारांकडून डॉलरची अधिक विचारणा होते.

स्पष्टीकरणाने रुपयाला भक्कमता!
तेल विपणन कंपन्यांसाठीची विशेष डॉलर  खिडकी तूर्त कायम ठेवण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या  स्पष्टीकरणाने भारतीय चलनाने शुक्रवारी ६१पर्यंत भक्कमता नोंदविली. त्या आधीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत ६१.७० पर्यंत घसरण रुपयाने दाखविली होती. तथापि तडक सावरून रुपया दिवसभरात ६०.९०च्या टप्प्यावर पोहोचला. यातून त्याने दोन महिन्यांचा उच्चांक गाठला. सप्ताहअखेर चलनात गुरुवारच्या तुलनेत किरकोळ, ४ पैशांची घसरण नोंदली गेली असली तरी रुपया अद्यापही ६१.२६ असा भक्कम आहे.

रुपयासाठी शुक्रवारचे सत्र सकारात्मक होते. एकूणच या सप्ताहात स्थानिक चलन एक टक्क्याने उंचावले आहे. कमकुवत अमेरिकन डॉलर आणि परिणामी विदेशी गुंतवणूकदार संस्थांची शेअर बाजारातील खरेदी यामुळे रुपया तुलनेने भक्कम बनला आहे. येत्या आठवडय़ातही रुपयात तेजी दिसून येईल.
– अभिषेक गोयंका
अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायजर्स.