एटीएम चालकांसाठी ‘रिकॅलिब्रेशन’आव्हानात्मक

निश्चलनीकरणानंतर चलनात आलेल्या २०० रुपयांच्या नवीन नोटेसाठी एटीएम यंत्रणा अद्यापही पुरती सज्ज झाली नसतानाच आता येऊ घातलेल्या १०० रुपयांच्या नोटेसाठी देशभरातील एटीएममधील रचनांमध्ये बदल करण्यासाठी वर्ष लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यासाठी एटीएम चालकांना १०० कोटी रुपयांचा खर्चही येणार असल्याचे सांगितले जाते.

रिझव्‍‌र्ह बँक चलनात आणू पाहणाऱ्या १०० रुपयांच्या नोटेचा आकार सध्या चलनात असलेल्या नोटेपेक्षा कमी आहे. सध्याची नोट लांबी व रुंदीला अनुक्रमे १५७ व ७३ मिमी असून नव्या नोटेची लांबी १४२ व रुंदी ६६ मिमी आहे. जांभळ्या रंगाची १०० रुपयांची नवी नोट लवकरच चलनात येईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने तिचे छायाचित्र जारी करीत गुरुवारी स्पष्ट केले.

देशभरात सध्या २.४० लाखांहून अधिक एटीएम आहेत. निश्चलनीकरणानंतर नव्या ५०० रुपयांच्या तसेच २,००० रुपयांच्या नोटेसाठी एटीएम चालकांना रकान्यांमध्ये (कॅसेट) बदल करावा लागला होता. परिणामी रोखीची चणचणीचा ग्राहकांना सामना करावा लागला होता. यानंतर २०० रुपयांची नवी नोट चलनात आली. त्यासाठीची एटीएमची अद्ययावता प्रक्रिया अद्यापही सुरू असून आता त्यात १०० रुपयांच्या नोटेसाठीच्या अपेक्षित बदलाची भर पडली आहे.

एटीएम चालक कंपन्यांचे संघटन असलेल्या ‘कॅटमी’चे संचालक व्ही. बालसुब्रमणिन यांनी सांगितल्याप्रमाणे, नव्या १०० रुपयाच्या नोटेसाठी एटीएमच्या सध्याच्या रचनेत बदल (रिकॅलिब्रेशन) करणे आवश्यक आहे. मात्र दोन्ही नोटा एटीएमध्ये ठेवणे आणि त्यानुरूप बदल अधिक आव्हानात्मक असल्याचे ते म्हणाले.

एफआयएस या एटीएम सेवा पुरवठादार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राधाराम दोराई यांच्या म्हणण्यानुसार, नव्या १०० रुपयांच्या नोटेचा पुरवठा व वितरण यामध्ये अडथळा येऊ शकतो.

हिताची पेमेंट सव्‍‌र्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक लोनी अँटोनी यांच्या मते, देशभरातील सध्या कार्यरत २.४० लाख एटीएमचे रकाने नव्या नोटेनुरूप बदलावयाचे झाल्यास वर्षभराचा कालावधी लागू शकतो; तसेच त्यासाठी एटीएम उत्पादकांना १०० कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. २०० रुपयांच्या नोटेसाठीचा एटीएम यंत्रणा बदल अद्याप पूर्ण झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.