अलिकडेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने व्याज दर कपात केली असून त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा या बँकेने व्यक्त केली आहे. रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी सांगितले, की रिझर्व बँकेने लागोपाठ दोनदा रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व बँकेने अतिशय कमी काळात दोनदा रेपो दरात कपात केली. त्याचे फायदे ग्राहकांना दिले पाहिजे. रिझर्व बँकेने व्याजदर जानेवारी २०१५ मध्ये ०.५ टक्क्य़ाने कमी केले होते पण बँकांनी त्याचा फायदा ग्राहकांना दिलेला नाही. ४ मार्चला पुन्हा दर कपात करण्यात आली व ७.७५ टक्क्य़ांवरून ते ७.५० टक्के करण्यात आले. त्यामुळे चलनवाढ कमी राहिली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, त्या वेळी ही दरकपात जाहीर केली होती. सरकार आर्थिक मजबुतीसाठी वचनबद्ध असल्याचे अर्थमंत्र्यांनी त्या वेळी सांगितले होते.
दरम्यान बँकांनी असे म्हटले आहे, की रिझर्व बँक ७ एप्रिलला द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. त्याची आम्ही वाट पाहत आहोत व त्यानंतर व्याजदर कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. आर.अय्यर यांनी सांगितले, की एप्रिलमध्ये रिझर्व बँकेचे पतधोरण बघितल्यानंतर बँका व्याज दर कमी करण्याचा विचार करतील. हे व्याजदर ०.१ ते ०.२५ टक्के कमी केले जाऊ शकतात. ग्राहकांना फायदा जरूर दिला जाईल, बँकांना मालमत्तेच्या दर्जाचाही विचार करावा लागतो व तोच कर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निकष असतो.