काळा पैसा रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्थेतील रोखीने होणारे व्यवहार कमी करण्याच्या हेतूने एटीएम कार्डावरील शुल्क कमी करण्याची तयारी सुरू केली आहे.
विविध कारणांनी होणारे रोखीचे व्यवहार कमी करण्याच्या हेतूने रिझव्‍‌र्ह बँक सरकारबरोबर चर्चा करत असून याबाबत लवकरच आराखडा सादर केला जाईल, अशी माहिती बँकेचे कार्यकारी संचालक जी. पद्मनाभन यांनी गुरुवारी दिली.
‘नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या परिषदेदरम्यान उपस्थित असलेल्या पद्मनाभन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोकडविरहित व्यवहार वाढण्यासाठी एटीएम कार्डावरील शुल्क कमी करण्याचे संकेतही दिले.
पद्मनाभन म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील काळा पैसा रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. रोकडविरहित व्यवहार वाढण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचाही पुढाकार आहेच. यासाठी व्यवहाराशी निगडित पायाभूत सुविधांची स्थितीचाही आढावा घेतला जाईल. रोकडविरहित व्यवहार हे अधिक सुलभ कसे होतील, यावरही भर दिला जाईल.
बँकांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर खर्चाव्यतिरिक्त दोन टक्के रक्कम संबंधित कार्डधारकाच्या खात्यातून कापून घेतली जाते. रिझव्‍‌र्ह बँक तयार करत असलेल्या आराखडय़ाबाबत येत्या पंधरवडय़ात स्पष्टता होईल.
विविध बँकांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डाद्वारे होणारे व्यवहार वाढविण्यासाठी कार्डावरील शुल्क कमी करून त्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही ते म्हणाले.
यासाठी पद्मनाभन यांनी दक्षिण कोरियासारख्या देशाचा दाखला दिला. रोकडविरहित व्यवहारांबाबत पायाभूत सुविधांबाबत असलेली उद्योगांची शंका दूर सारून त्यांनाही यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.