अणुऊर्जेसंबंधी करारानंतर नैसर्गिक वायूने संपन्न इराणवरील आंतरराष्ट्रीय र्निबध उठणे हे सार्वजनिक क्षेत्रातील खत कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लि.-‘आरसीएफ’साठी मोठी संधी निर्माण करणारे ठरले आहे. कंपनीचे इराणबरोबर दीर्घ मुदतीच्या गॅसपुरवठय़ाच्या करारासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होतेच, आता इराणमध्ये संयुक्त भागीदारीतून प्रकल्प स्थापण्याचा तिचा बेत आहे.
इराणमध्ये सुयोग्य भागीदाराच्या शोधात आपण असल्याचे आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. जी. राजन यांनी सांगितले. आरसीएफची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी मुंबईत पार पडली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुमारे १२.७ लाख टन क्षमतेच्या युरिया उत्पादन प्रकल्पासाठी पुरेशी जागा असलेल्या तीन भागीदारांची नावे निश्चित करण्यात आली असून, एसबीआय कॅपिटल मार्केट्स या नियुक्त संस्थेकडून आवश्यक ती चाचपणी करून अंतिम नाव मंजूर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायजर्स आणि जीएसएफसी असे आरसीएफचे या प्रकल्पासाठी अन्य दोन भागीदार असतील, अशी माहिती कंपनीचे वित्त संचालक सुरेश वॉरियर यांनी दिली.
देशांतर्गत युरिया खतासाठी वाढती मागणी पाहता, आरसीएफला युरिया निर्मिती क्षमता विस्तारण्याला खूप मोठा वाव आहे. या दृष्टीने कंपनीने अलिबागनजीक थळ येथे १२.७ लाख टन क्षमतेचा नवीन प्रकल्प आणि ओडिशातील तालचेर येथे तेवढय़ाच क्षमतेचा दुसरा भागीदारी प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. थळ प्रकल्पाला सरकारकडून पुढील १४ दिवसांत हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असल्याचे राजन यांनी सांगितले.
कंपनीची सध्याची युरिया उत्पादन क्षमता २४ लाख टनांची असून, देशातील प्रस्तावित हे दोन प्रकल्प कार्यान्वित झाल्यास दुपटीहून अधिक वाढेल. भारतात दरसाल ७० ते ८० लाख टन युरियाची आयात होत असते. आरसीएफने सरलेल्या २०१४-१५ आर्थिक वर्षांअखेर ७,७८७.८१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर आजवरचा सर्वाधिक ३२२.०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, भागधारकांना १८ टक्क्य़ांचा अंतिम लाभांशही कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.