गोरखपूर (उत्तर प्रदेश) व सिंद्री (झारखंड) येथील ‘फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एफसीआयएल)’च्या प्रत्येकी १.२७ मेट्रिक टन क्षमतेच्या युरिया प्रकल्पांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ)ने उत्सुकता दर्शविली आहे. देशातील युरिया उत्पादनक्षमतेत वाढीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकारने या आजारी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी उत्सुक कंपन्यांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संबंधाने मुंबईत पहिल्या रोड शोचे संभाव्य गुंतवणूकदारांपुढे अलीकडेच आयोजन करण्यात आले होते. मोठय़ा क्षेत्रफळावर स्थापित हे प्रकल्प मोक्याच्या ठिकाणी आणि संपूर्ण पायाभूत सुविधांनी सज्ज असून, केंद्र सरकारच्या खते व रसायन विभागाने वायूपुरवठय़ाची व त्यासाठी वाहिन्या टाकण्याची हमीही या प्रकल्पासाठी दिली आहे. या कार्यक्रमाला एफसीआयएल, गेल, पीडीआयएल आणि केंद्रीय खते विभागाचे अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून, शंका-प्रश्नांचे निरसन केले.