अनिल धीरूभाई अंबानी समूहातील कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची उपकंपनी ग्लोबल काउड एक्स्चेंजने (पूर्वाश्रमीची रिलायन्स ग्लोबकॉम) मुंबई ते सिंगापूर समुद्राखालील केबलवाहिनी टाकण्याची घोषणा गुरुवारी येथे केली. संचार सेवांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या आयसीएक्स केबल उपक्रमासाठी सुमारे १२०० कोटी रुपयांची (२०० दशलक्ष अमेरिकी डॉलर) गुंतवणुकीचे नियोजन आहे.
या नव्या वाहिनीतून ग्लोबल काउड एक्स्चेंज ही युरोप खंडाला आशियातील सर्व प्रमुख बाजार केंद्रांशी समुद्राखालील तार संपर्काने जोडणारी अग्रेसर कंपनी बनेल. जगातील उदयोन्मुख बाजारपेठांच्या परस्परांशी थेट संधानासाठी आखलेल्या सुनियोजित धोरणाअंतर्गत नवीन मुंबई-सिंगापूर समुद्री तार जोडणीची हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून या प्रकल्पात भागीदारीसाठी आणखी तीन कंपन्यांशी बोलणी सुरू आहे, असे ग्लोबल काउड एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम बार्नी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रत्येक भागीदार कंपनीकडून ४०-४५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संभाव्य भागीदारांची नावे जाहीर करण्यास बार्नी यांनी मात्र नकार दर्शविला. या तीन भागीदारांपैकी एक हा तंत्रज्ञानात्मक पाठबळ पुरविणारा भागीदार असेल, असे मात्र त्यांनी सांगितले.
या समुद्राखालील केबल जोडणीचे मुंबई, थिरुवअंनतपुरम आणि चेन्नई अशी भारतातील लँडिंग स्टेशन्स असतील, तर सिंगापूपर्यंतच्या प्रस्थानादरम्यान श्रीलंका येथे लँडिंग स्टेशन्स स्थापण्याचा कंपनीचा विचार सुरू आहे. आगामी २४ महिन्यांत या केबलवाहिनीचे काम पूर्ण होईल, असे बार्नी यांनी स्पष्ट केले.