गेल्या अनेक सत्रांपासून ५५ या अस्वस्थता निर्माण करणाऱ्या पातळीखाली प्रवास करणारे भारतीय चलन सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्याच्या ऐतिहासिक नीचांकाला येऊन ठेपले. एकाच व्यवहारात तब्बल १.०९ रुपयांनी घसरत रुपया ५८.१६ पर्यंत खालावला. रुपयाच्या या ‘न भूतो..’ गटांगळीमुळे महागाई आणि चालू खात्यातील तूट फुगण्याची भीती वाढली असून आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या पतधोरणातील बहुप्रतिक्षीत व्याजदर कपातही लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
भांडवली बाजारातील मंदीचा परिणाम विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांवर होत असून त्यांच्यामार्फत निधी काढून घेतला जात आहे. यामुळे तसेच आयातदारांकडून डॉलरची जोरदार मागणी नोंदली जात असून परिणामी रुपयातील घसरण वाढत चालली आहे.
सोमवारी तर दिवस नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाच रुपया डॉलरच्या तुलनेत ५७.५४ हा नवा उच्चांक स्थापन करता झाला. शुक्रवारच्या तुलनेत या वेळी ४८ पैशांची घसरण झाली. रिझव्‍‌र्ह बँकेमार्फतही रुपयातील घसरण रोखण्यास हस्तक्षेप न करण्याची शक्यता वर्तविल्याने चलनातील घट दिवसअखेपर्यंत वाढत गेली. दिवसभरात ५७.१८ पर्यंत गेल्यानंतर रुपया अखेर शुक्रवारच्या तुलनेत १०९ पैशांनी घरंगळत ५८ च्याही खाली ५८.१६ थांबला.
गेल्या महिन्याभरात भारतीय चलन ८ टक्क्यांनी रोडावले आहे. मेच्या सुरुवातीला रुपया ५३.८० वर होता. रुपयाची यापूर्वीची दिवसातील सर्वाधिक घसरण २२ जून २०१२ मध्ये ५७.३२ वर होती. तर व्यवहाराखेर २२ सप्टेंबर २०११ रोजी एकाच सत्रात स्थानिक चलनाने सर्वाधिक १२४ पैशांची आपटी खाल्ली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरणच भांडवली बाजाराला दिशा देऊ शकते, असे अल्पारी फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट्ट यांनी म्हटले आहे. गुंतवणूकदारही येत्या १७ जूनच्याच मध्य तिमाही पतधोरणाची वाट पाहत आहेत, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, मध्यवर्ती बँकेमार्फत रुपयातील घसरण रोखण्यासाठी मध्यस्थी होण्याची शक्यताही ते वर्तवितात.