सिंगापूरस्थित आंतरराष्ट्रीय लवादाने रिलायन्स समूहाबरोबरच्या विलीनीकरणाला दिलेल्या स्थगिती निर्णयाला आव्हान देण्याचे संके त फ्युचर रिटेलने दिले आहेत.

रिलायन्स समूहामार्फत २४,७१३ कोटी रुपयांच्या फ्युचर रिटेल व्यवसाय खरेदी व्यवहाराला अ‍ॅमेझॉनने रविवारी स्थगिती मिळविली.  अमेरिकी अ‍ॅमेझॉनने गेल्या वर्षी फ्युचर समूहाच्या किरकोळ विक्री तसेच वस्त्र प्रावरणे विक्री व्यवसायातील मोठा हिस्सा खरेदी के ला होता. फ्युचर रिटेलच्या फ्युचर कू पन्समधील ४९ टक्के  हिस्सा अ‍ॅमेझॉनने आपल्या ताब्यात घेतला होता.

अ‍ॅमेझॉनबरोबर आधीपासून अस्तित्वात असलेल्या करारानंतरही फ्युचरने रिलायन्सला  किरकोळ तसेच घाऊक आणि लॉजिस्टिकस व्यवसाय विकून, मूळ कराराचे उल्लंघन केल्याचा आक्षेप लवादात सुनावणीच्या वेळी नोंदविण्यात आला.

देशभरात १,५०० हून अधिक विक्री दालने असलेल्या फ्युचर रिटेलच्या खरेदीसाठी रिलायन्ससह अ‍ॅमेझॉनबरोबरच वॉलमार्टच्या फ्लिपकार्ट समूह उत्सुक होता. व्यवसाय खरेदी-विक्री झाल्यास पहिल्यांदा अ‍ॅमेझॉनला प्राधान्य देण्याबाबत तसेच बिगरस्पर्धा करारही झाल्याचा दावा अ‍ॅमेझॉनने के ला आहे. या करारानंतर तीन ते १० वर्षांत फ्युचर समूहात  स्वारस्य दाखविण्याबाबतची  तरतूद असल्याचेही अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे.

समभाग मूल्य घसरण

आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाने रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच फ्युचर समूहातील कं पन्यांचे समभाग मूल्य सोमवारी कमालीने रोडावले. भांडवली बाजारात सूचिबद्ध समूहातील अनेक कंपन्यांचे मूल्य एकाच व्यवहारात १० टक्क्यांपर्यंत घसरले.  यामध्ये फ्युच्यर लाइफस्टाईल फॅ शन्स, फ्युचर रिटेल यांचा समावेश होता. तर फ्युचर एंटरप्राइजेस, फ्युचर कन्झ्युमरने त्यांची किमान व्यवहार पातळीही सोडली.

व्यवहार पूर्ण होणारच – रिलायन्स इंडस्ट्रीज

फ्युचर समूहाबरोबर झालेला खरेदी व्यवहार हा भारतीय कायद्याच्या नियमांतर्गतच झाला असून तो नक्कीच तडीस जाईल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजची किरकोळ विक्री व्यवसाय क्षेत्रातील उपकं पनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने व्यक्त  केला आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यांतर्गतच फ्युचर समूहाबरोबरचा व्यवहार झाला असून त्याची पूर्तता कोणत्याही विलंबाशिवाय होण्याबद्दल त्यांनी खात्री व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाचा फ्युचर तसेच रिलायन्सच्या पतमानांकनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. भक्कम आर्थिक स्थिती आणि किरकोळ विक्री व्यवसायातील निर्विवाद स्थान पाहता दोन्ही कंपन्यांबाबत काही नकारात्मक घडेल, असे वाटत नाही.

– श्वेता पतोडिया, विश्लेषक, कंपनी वित्त समूह, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस