करोना आपत्तीमुळे सर्वार्थाने आव्हानात्मक ठरलेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सहकार क्षेत्रातील टीजेएसबी बँकेने ताळेबंद अधिक सशक्त करताना, नफ्यात विक्रमी वाढीची कामगिरी केली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवारी, ९ एप्रिलला म्हणजे आर्थिक वर्षाच्या समापनाच्या पहिल्या नऊ दिवसात बँकेने लेखापरीक्षित निष्कर्ष जाहीर केले आणि पारदर्शक व्यवहारांची पुन्हा एकदा प्रचीती दिली.

संपूर्ण आर्थिक जगतात आणि त्यामुळे बँकिंग विश्वाातही अनिश्चिातता आणि व्यवसाय वृद्धीला मर्यादा आलेल्या २०२०-२१ मध्ये टीजेएसबी बँकेने १६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर नोंदविलेल्या १२० कोटी रुपयांच्या तुलनेत बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल त्रेचाळीस कोटींची विक्रमी वाढ झाली आहे.

बँकेच्या आश्वाासक कामगिरीविषयी बोलताना अध्यक्ष विवेकानंद पत्की म्हणाले, करोना महामारीच्या काळातही बँकेने कामगिरीतील सातत्य टिकवत काही नोंद घ्यावे असे उच्चांक गाठले आहेत. अनुत्पादित कर्जांचे योग्य व्यवस्थापन, खर्चावरील नियंत्रण आणि बँकेने योग्यवेळी केलेल्या सर्व उपाययोजना यामुळे बँकेच्या निव्वळ नफ्यात रुपये ४३ कोटी एवढी भरीव वाढ झाली आहे. १६३ कोटीचा निव्वळ नफा हा बँकेच्या इतिहासातील नवा उच्चांक आहे.

अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने बघून नवीन कर्जे मंजूर करताना कोणत्याही प्रकारचे धाडसी किंवा आक्रमक निर्णय न घेता तसेच व्यवसाय वृद्धीच्या मागे न लागता बँंकेने सावध पवित्रा घेतला. त्यामुळे बँकेच्या एकूण कर्जामध्ये नाममात्र १० कोटींची घट झाली असली तरी  कर्जाची गुणवत्ता उत्तम राखली गेली. तसेच वेळोवेळी केलेल्या ठेवी व कर्जे यांवरील व्याज दरातील योग्य बदलांमुळे बँकेने या वर्षी विक्रमी नफ्याची नोंद केली आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये बँकेच्या ठेवींमध्ये ६७५ कोटींची वाढ होऊन बँकेच्या एकूण ठेवी १२,०४९ कोटी रुपये झाल्या आहेत. अत्यल्प १० कोटींची घट होऊन बँकेची कर्जे ५,६३१ कोटी रुपये इतकी झाली आहेत. बँकेची ढोबळ अनुत्पादित कर्जे रु. ३३० कोटी (५.८६ टक्के) वरून रु. २३७ कोटी (४.२३ टक्के) इतकी कमी झाली आहेत. निव्वळ अनुत्पादित कर्जे शून्य टक्के असल्याचा बँकेने दावा केला आहे.

शून्य टक्के अनुत्पादित कर्जे, भांडवल पर्याप्ततेचे १६.१६ टक्के प्रमाण आणि १६३ कोटी रुपयांचा बँकेच्या इतिहासातील विक्रमी निव्वळ नफा हे बँकेच्या अत्यंत भक्कम आर्थिक परिस्थितीचे द्योतक आहे.

  • विवेकानंद पत्की,  अध्यक्ष – टीजेएसबी बँक

प्रतिकूल परिस्थितीतील ही सक्षम कामगिरी बँकेवरील ग्राहकांचा विश्वाास अधिक वाढविणारी ठरेल. शिवाय या संकट काळात घवघवीत व्यवसायिक यश कमावून तिने नागरी सहकारी बँकिंगमध्ये एक नवा विश्वाास जागवला आहे.

  • सुनील साठे, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी – टीजेएसबी बँक