चालू आर्थिक वर्षांत ४२ अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार

मध्य पूर्व तसेच दक्षिण आशियातील देशांमधून भारतातील रत्ने व दागिने निर्यातीला मागणी चालू आर्थिक वाढणार असून यंदा ती विक्रमी ४१ ते ४२ अब्ज डॉलरवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

भारताची रत्ने व दागिने निर्यात २०१६-१७ या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत ३६ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

नव्या अंदाजाबाबत रत्ने व दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) च्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल संखवाल यांनी आशावाद व्यक्त केला आहे. भारतातील मौल्यवान वस्तूंना मध्य पूर्व तसेच दक्षिण आशिया देशांकडून मागणी असेल.

संखवाल यांनी मात्र दुबईमार्फत ५ टक्के आयात शुल्क लावण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हे शुल्क सोने तसेच हिऱ्यांचे दागिने यावर आहे. भारतासाठी ही चिंताजनक स्थिती असल्याचे मानले जाते.

याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर होईल, अशी भीती संखवाल यांनी व्यक्त केली आहे. याबाबत भारत सार्क मध्य पूर्व खरेदी विक्री बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

तीन दिवसांच्या या बैठकीत स्थानिक ३८ निर्माते, ७० आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होत आहेत. येथे मौल्यवान धातूंचे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. भारतासह, बांगलादेश, श्रीलंका, इजिप्त, ओमान, कतार आदी देश त्यात सहभागी होत आहेत. या प्रदर्शनामध्ये विविध देशांना त्यांचे मौल्यवान धातू क्षेत्रातील योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी मिळणार आहे.