मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वाढून १५,८७३ च्या वर पोहोचला. बीएसईचा ३० समभाग असलेला सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स मंगळवारी ३१० अंकांच्या वाढीसह ५२,८८५०४  वर खुला झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीच्या आजच्या दिवसाची सुरुवात १५,८४०.५० वरुन झाली. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी नेक्स्ट ५० मध्ये ३९५.३५ अंक, निफ्टी मिडकॅप ५० मध्ये ६७.८५ (०.९२%) गुण, निफ्टी बँक २५५.६० (०.७३%) आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसमध्ये १२3.५ (०.७५%) अंकांची वाढ झाली आहे.

अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा झेप

अदानी समूहाच्या शेअर्सने पुन्हा झेप घेतली आहे. गौतम अदानीची संपत्ती काही मिनिटांत ५ अब्ज डॉलर्सने वाढली. अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सलग दुसर्‍या दिवशी किंमतीत वाढ दिसून येत आहे. यामुळे ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांची संपत्ती काही मिनिटांत ५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढली आहे. फोर्ब्स रियल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी आता १६ व्या स्थानावर आहेत आणि त्यांची संपत्ती ६७.७ अब्ज डॉलर्स आहे.

सेन्सेक्सने गाठला उच्चांक

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारातील प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स ३५० अंकांच्या वर गेला. जागतिक शेअर बाजाराच्या सकारात्मक तुलनेत हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक या समभागांच्या तेजीत तेजी दिसून आली. यादरम्यान सेन्सेक्सने आतापर्यंतच्या उच्चांक गाठला. सेन्सेक्समध्ये दोन टक्क्यांचा सर्वाधिक वाढ ही मारुतीच्या शेअर्समध्ये झाली. याशिवाय एमअ‍ॅन्डएम, एलअ‍ॅन्ड टी, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि एचडीएफसी यांच्या शेअर्समध्ये देखील वाढ झाली आहे. मागील सत्रात सेन्सेक्स २३०.०१ अंक किंवा ०.४४ टक्क्यांनी वधारून ५२,५७४.४६  वर बंद झाला होता. त्याचप्रमाणे निफ्टी ६३.१५ अंकांनी किंवा ०.४० टक्क्यांनी वधारून १५,७४६.५० वर बंद झाली. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारी सकल आधारावर १,२४४.७१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत, असे शेअर बाजाराच्या अस्थायी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.३५ टक्क्यांनी वाढून ७५.१६ डॉलर प्रति बॅरलवर होता.