देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण गंगाजळी सलग तिसऱ्या महिन्यातही रोडावली आहे. भांडवली बाजारातील घसरणीने जानेवारीअखेर सर्व फंडांकडे जमा मालमत्ता १२.७४ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे.
सर्व ४० म्युच्युअल फंड घराण्यांची डिसेंबर २०१५ अखेर असलेली १२,७४,८३५ कोटी रुपयांची मालमत्ती होती. जानेवारी २०१६ अखेरची ती घटून १२,७३,७१४ कोटी रुपयांवर आली आहे.
म्युच्युअल फंड उद्योगाचे संघटना ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०१५ पासून फंड मालमत्ता घसरत आहे. या कालावधीत ती १२.९५ लाख कोटी रुपये होती. उद्योगाची फंड मालमत्ता ऑक्टोबर २०१५ मध्ये १३.२४ लाख कोटी रुपये अशा सर्वोच्च टप्प्यावर पोहोचली होती. सप्टेंबर २०१५ मध्ये ती ११.८७ लाख कोटी रुपये होती.
संपूर्ण जानेवारीमध्ये ‘सेन्सेक्स’मधील ५ टक्क्य़ांपर्यंत घसरणीमुळे एकूणच समभागाशी निगडित फंड मालमत्तांमध्ये घसरण नोंदली गेली आहे.
समभाग निगडित फंड योजनांमध्ये जानेवारीत २९१४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. डिसेंबरमधील ३६४४ कोटी रुपयांच्या तुलनेत ती कमी आहे. तर फंड मालमत्ता सर्वोच्च स्थानी असताना, ऑक्टोबरमध्ये समभाग निगडित फंड योजनांमधील गुंतवणूक तब्बल ६००० कोटींहून अधिक होती.
महिंद्र समूहही रिंगणात दाखल
नवी दिल्ली: पेमेंट बँक परवाना मिळालेल्या महिंद्र समूहाच्या देशातील म्युच्युअल फंड उद्योग क्षेत्रातील शिरकावाला गती मिळत आहे. भांडवली बाजार नियामक सेबीने समूहाच्या अशा प्रस्तावाला गुरुवारी सायंकाळी मंजुरी दिली. महिंद्र समूह तिच्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस (एमएमएफएस) या उपकंपनीमार्फत म्युच्युअल फंड योजनांसाठी महिंद्र अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी सुरू करत आहे. तशी अधिकृत परवानगी मिळाल्याचे कंपनीने शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराला कळविले. या व्यवसायात कोणती, किती योजना आणि त्या केव्हा सादर करावयाच्या याबाबत अद्याप ‘एमएमएफएस’ने स्पष्ट केलेले नाही. कंपनीच्या देशभरात १००० हून अधिक शाखा आहेत. समूहाच्या टेक महिंद्रला यापूर्वीच पेमेंट बँक म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेकडून परवाना मिळाला आहे.
भारतात ४० हून अधिक फंड घराणी असून प्रत्येकी एक लाख कोटींहून अधिक गुंतवणूक निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या चार बडय़ा कंपन्यांमध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड अव्वल, तर त्यानंतर रिलायन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल व बिर्ला सन लाईफ अशी क्रमवारी आहे.