News Flash

क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

अधिकारी वर्ग गुरुवारपासून दोन दिवसांच्या (१० व ११ मार्च रोजी) संपावर जात आहेत.

खासगीकरणाला विरोध आणि निवृत्तिवेतन लागू करण्याच्या मागणीसाठी देशभरातील ग्रामीण बँकेतील कर्मचारी, अधिकारी वर्ग गुरुवारपासून दोन दिवसांच्या (१० व ११ मार्च रोजी) संपावर जात आहेत.
‘अखिल भारतीय क्षेत्रीय ग्रामीण बँक कर्मचारी संघटना’ (एआयआरआरबीईए)च्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या संपात बँकांमधील ८५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होत असल्याचे सरचिटणीस ए. सईद खान यांनी सांगितले.
क्षेत्रीय ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची हाक दिल्याने बँकांचे व्यवहार सलग चार दिवस ठप्प राहणार आहेत. गुरुवार व शुक्रवारी संप आंदोलन पुकारल्यानंतर या बँकांमध्ये महिन्यातील दुसरा शनिवार व सार्वजनिक सुटी म्हणून रविवारी व्यवहार होणार नाहीत.
ग्रामीण बँकांना प्रायोजकत्व लाभलेल्या सार्वजनिक बँकांप्रमाणेच निवृत्तिवेतन असावे, अशी प्रमुख मागणी आंदोलक संघटनेची आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय ग्रामीण बँकांमधील सरकारी हिस्सा कमी करण्यासही विरोध दर्शविण्यात आला आहे.
बँकेतील मनुष्यबळ विकास धोरणाबाबतचा मित्रा समितीचा अहवाल स्वीकारू नये, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेणे तसेच नव्याने नियुक्त अधिकारी वर्गाच्या कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी सुधारणे आदी मागण्या याबाबत पुढे करण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय ग्रामीण बँकेमधील प्रायोजकत्व लाभलेल्या बँकेच्या योगदानाला न्याय मिळण्यासाठी बँक व्यवस्थापनाची संघटना असलेल्या ‘आयबीए’ने चर्चात्मक मंच स्थापन करावा, असेही यानिमित्ताने सुचविण्यात आले आहे.

कामगारांचे आज धरणे आंदोलन
केंद्र व विविध राज्य सरकारने कामगारविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संयुक्त कामगार संघटनेच्या कृती समितीने गुरुवार, १० मार्च रोजी एक दिवसाच्या धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. विविध ११ केंद्रीय कामगार संघटनेच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनाचा भाग म्हणून आझाद मैदान येथे दुपारी निदर्शने करण्यात येणार आहे. यात केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, बँक, विमा, रेल्वे, बंदरमधील कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारही सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 3:35 am

Web Title: regional rural banks employees strike
Next Stories
1 ‘कॉन्कॉर विक्री’ला संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून दुप्पट भरणा
2 मल्यांच्या परदेशगमनावर आज निर्णय?
3 अंबानी बंधूंतील व्यावसायिक शत्रुत्वाचा भडका अपरिहार्य!
Just Now!
X