पाण्याखालील दूरसंचार लहरीचे बंगालच्या उपसागरात भारतासाठीचे दूरसंचाराचे प्रवेशद्वार होण्याचा मार्ग रिलायन्सच्या पुढाकाराने खुला झाला आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओसह व्होडाफोन आदी सहा कंपन्यांनी मलेशिया आणि सिंगापूरला मध्यपूर्वेशी जोडण्यासाठी बंगालच्या उपसागराखालून केबल यंत्रणा (बे ऑफ बेंगाल गेटवे- बीबीजी) प्रस्थापित करण्यासंदर्भात मंगळवारी एकत्र येऊन याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कंपन्यांमध्ये भारतातील रिलायन्स जिओ इन्फोकॉम व  व्होडाफोन या कंपन्यांचा समावेश आहे. याखेरीज टेलिकॉम मलेशिया बेऱ्हाड (मलेशिया), ओमान्टेल (ओमान), एटिसॅलाट (संयुक्त अरब अमिरात), डायलॉग अ‍ॅक्सिएटा (श्रीलंका) आदी कंपन्यांनी कौलालंपूर येथे या करारावर स्वाक्षऱ्या केल्या, असे रिलायन्सच्या जिओच्या वतीने सांगण्यात आले.
ही यंत्रणा २०१४च्या अखेरिस व्यावसायिक स्तरावर कार्यान्वित होणार आहे. ८,००० किलोमीटर लांबीच्या या केबल यंत्रणेद्वारे मलेशिया आणि सिंगापूरला मध्यपूर्वेतील ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमधील देश जोडले जातील तसेच मुंबई व चेन्नई आणि श्रीलंकेतही दूरसंचार संपर्क प्रस्थापित करणे शक्य होईल. केवळ आशिया अथवा मध्यपूर्वेतच संपर्क प्रस्थापित करण्याची योजना नाही तर युरोप, आफ्रिका आणि पूर्व आशियातही या यंत्रणेद्वारे संपर्काचे माध्यम उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे, असे सांगण्यात आले. उद्योगवृद्धीसाठी एक संधी म्हणूनही या यंत्रणेचा उपयोग होईल, असा दावा रिलायन्सच्या पत्रकामध्ये करण्यात आला. या यंत्रणेसाठी ‘१०० जीबीपीएस’ या वेग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.