डिसेंबरमध्ये १३ अब्ज डॉलर तूट

गेल्या महिन्यात आयात घसरूनही तुलनेत निर्यात काही प्रमाणात वाढल्याने देशाची व्यापार तूट कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये निर्यात ०.३४ टक्क्यांनी वाढून २७.९३ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. तर या कालावधीत आयात २.४४ टक्क्यांनी कमी होत ४१ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या महिन्यात व्यापार तूट १३ अब्ज डॉलर राहिली आहे.

वर्षभरापूर्वीच्या, डिसेंबर २०१७ मधील १४.२ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा आयात – निर्यातीतील दरी मानली जाणारी व्यापार तूट कमी झाली आहे.

गेल्या महिन्यात अभियांत्रिकी तसेच रत्न व दागिने क्षेत्रातील नकारात्मक प्रवासामुळे देशाची निर्यात किरकोळ प्रमाणातच वाढू शकली. तर सोने आयात २४.३३ टक्क्यांनी कमी होत २.५६ अब्ज डॉलर झाली आहे. तेल आयात गेल्या महिन्यात ३.१६ टक्क्यांनी वाढून १०.६७ अब्ज डॉलरवर गेली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते डिसेंबर या पहिल्या आठ महिन्यांत निर्यात १०.१८ टक्क्यांनी विस्तारत २४५.४४ अब्ज डॉलर झाली आहे. तर या दरम्यान निर्यात १२.६१ टक्क्यांनी वाढत ३८६.६५ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. गेल्या एकूण आठ महिन्यांत व्यापार तूट १४१.२० अब्ज झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती १२०.५७ अब्ज डॉलर होती.