मुंबई : विक्रमी घोडदौड सुरू असलेल्या भांडवली बाजारात, गुरुवारी मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजने ऐतिहासिक कामगिरी बजावली. बाजार भांडवलात १० लाख कोटी रुपयांचे शिखर सर करणारी ती भारतातील पहिली कंपनी ठरली आहे.

मुंबई शेअर बाजारातील एकूण सूचिबद्ध कंपन्यांमध्ये रिलायन्सला हे यश गुरुवारच्या अवघ्या ०.६५ टक्के समभागमूल्य वाढीने गाठता आले. महिन्यातील वायदापूर्तीच्या दिवशी झालेल्या व्यवहाराअंती कंपनीचा समभाग १,५७९.९५ रुपयांवर स्थिरावला. तत्पूर्वी त्याने एक टक्क्याच्या वाढीसह १,५८४ रुपये अशी विक्रमी समभागमूल्य गवसणी घातली. वर्षभरात रिलायन्सचा समभाग ४१ टक्क्यांनी वाढला आहे. तुलनेत २०१९ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स १४ टक्क्यांनी विस्तारला आहे.

रिलायन्सने नुकताच दुसऱ्या तिमाहीतील विक्रमी नफ्याचा ताळेबंद जाहीर केला आहे. तेल व वायू, किरकोळ विक्री, दूरसंचार अशा क्षेत्रांत व्यवसाय असलेल्या रिलायन्सच्या बाजारमूल्याला गुरुवारच्या अनोख्या टप्प्यापासून गेले पाच सत्र हुलकावणी मिळत होती.

रिलायन्सने चालू वर्षांत ऑगस्टमध्ये ८ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल कमावले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबरला ९ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा तिने गाठला होता. नंतरच्या एक लाख कोटींचा स्तर रिलायन्सने बाजारात झालेल्या २७ व्यवहार दिवसांमध्ये  पार केला आहे.

बाजार भांडवलात रिलायन्सपासून मोठय़ा फरकाने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा समूहातील टीसीएसचे बाजार भांडवल गुरुवारअखेर ७.७९ लाख कोटी रुपये आहे, तर एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड यांचे अनुक्रमे ६.९२ लाख कोटी व ३.९८ लाख कोटी रुपये बाजार भांडवल आहे. ४.५१ लाख कोटी रुपयांसह हिंदुस्थान युनिलिव्हर बाजार भांडवलाबाबत चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे.