‘केअर’कडून गुंतवणूक पत खालावल्याचा उपकंपन्यांना फटका

‘केअर’ या पतमापन संस्थेने अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनी आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स यांची गुंतवणूक पत खालावल्याची झळ रोखे आणि हायब्रीड इक्विटी फंडांना बसली आहे.

‘केअर रेटिंग एजन्सी’ने ४,९७९ कोटीच्या दीर्घमुदतीचे बँकांकडून घेतलेले वित्तीय सहाय्य आणि १२,७०० कोटींच्या अपरिवर्तनीय रोख्यांची पत ‘दिवाळखोर’ अशी केली आहे. या पत खालावण्याची झळ रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, युटीआय म्युच्युअल फंड आणि एसबीआय म्युच्युअल फंडांच्या योजनांना बसणार आहे. रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सने १,५४६ कोटी, एसबीआय म्युच्युअल फंडाने ७८८ कोटी तर युटीआय म्युच्युअल फंडाने ७१ कोटींची गुंतवणूक रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्सच्या कर्ज रोख्यात केली आहे.

मागील वर्षभरात म्युच्युअल फंड उद्योगास पत घसरणीचा बसलेला हा तिसरा धक्का आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आयएल अँड एफएस कंपनी मुदतपूर्तीनंतर रोखे धारकांना पैशांची परतफेड करण्यास असमर्थ ठरली.

मार्च एप्रिल महिन्यात झी समूहाच्या काही कंपन्या मुदतपूर्ती नंतर रोखे धारकांना पैशांची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आता अनिल अंबानी समूहाच्या गृह वित्त आणि व्यापारी कर्ज वितरण व्यवसायात असणाऱ्या कंपन्यांची पत  ‘दिवाळखोर’ ठरल्याने या कंपन्यांच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या फंड घराण्यांच्या योजनांना याचा फटका बसेल.

मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना पत घसरणीचा फटका बसलेल्या रोख्यांचे मूल्य कमी करावे लागणार असल्याने फंडाच्या नक्त मालमत्ता मूल्यांत मोठी घसरण अपेक्षित आहे.  या कागदपत्रांचे मूल्य चिन्हांकित करावे लागेल. यामुळे त्यांच्याकडे असलेल्या योजनांच्या एनएव्ही कमी होतील.

या गुंतवणुकीचे प्रमाण किती टक्के किंवा टक्के निधी व्यवस्थापकांनी चिन्हांकित केले ते लगेच कळू शकले नाही. पतमानांकन कंपन्यांनी एखाद्या रोख्याची पत किमान गुंतवणूक पायरीच्या खाली घटविल्यानंतर अशा रोख्यांचे रोजचे मुल्यांकन त्रयस्थाकडून केले जात नाही. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी या रोख्यांचे मुल्यांकन ठरवायचे असून त्या नुसार ५० ते १०० टक्के दरम्यान मुअल्यांकन कमी होऊ शकते.