दोन उपकंपन्यांतील मालकी विक्रीद्वारे उपाययोजना

नवी दिल्ली : वित्तीय सेवा व्यवसाय असलेल्या रिलायन्स कॅपिटलने येत्या तीन ते चार महिन्यांत कर्जभार निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. समूहातील दोन उपकंपन्यांमधील मालकीच्या विक्रीतून हे साधण्याचे  अनिल अंबानी समूहातील या कंपनीने निर्णय घेतला आहे.

रिलायन्स कॅपिटलवर सध्या एकूण १८,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. पैकी ते येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये १०,००० ते १२,००० कोटी रुपयांवर आणण्यात येईल, असे रिलायन्स कॅपिटलने गुरुवारी स्पष्ट केले.

याकरिता कंपनी तिच्या रिलायन्स निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंटमधील ४३ टक्के हिस्सा विकेल. याद्वारे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ५,००० कोटी रुपये उभे राहतील, असेही सांगण्यात आले. तर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीतील संपूर्ण ४९ टक्के हिस्सा विकण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड व्यवसायातील कंपनीचे अस्तित्वही संपुष्टात येईल.

रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या भांडवली बाजारातील प्रवेशाकरिता फेब्रुवारीमध्ये कंपनीने सेबीकडे अर्ज केला आहे. या सामान्य विमा कंपनीत रिलायन्स कॅपिटलची १०० टक्के भागीदारी आहे, तर म्युच्युअल फंड व्यवसायात रिलायन्सची जपानच्या निप्पॉनबरोबर भागीदारी आहे.

रिलायन्स कॅपिटलवरील एकूण कर्जभार कमी करण्याचा प्रयत्न म्हणून समूह तिच्या प्रमुख व्यवसायावर लक्ष केंद्रित करत असून प्राइम फोकस लिमिटेडसारख्या अन्य माध्यम मालमत्तांमधील हिस्साही विकेल, असे नमूद करण्यात आले आहे.