बँक परवाना मिळेलच असा दावा करीत रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी यातून समूहावरील एकूण कर्जभारही हलका करता येईल, असा विश्वास मंगळवारी व्यक्त केला. प्रस्तावित बँकेची नोंदणी ती अस्तित्वात आल्यापासून तीन वर्षांत भांडवली बाजारात करण्यात येईल, असा मानसही त्यांनी स्पष्ट केला.
रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहाची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. तिला अनिल हे स्वत: पत्नी टीना यांच्यासह उपस्थित होते. समूहातील रिलायन्स कॅपिटल या वित्त क्षेत्रातील कंपनीने रिझव्र्ह बँकेकडे नव्या खासगी बँक परवान्यासाठी अर्ज केला आहे. तिच्यासह २६ कंपन्यांनी असे अर्ज मध्यवर्ती बँकेकडे गेल्या महिन्यात सादर केले आहेत. त्यावर अंतिम निर्णय आगामी वर्षांत होणार आहे.
याबाबत अंबानी यांनी भागधारकांना संबोधित करताना सांगितले की, नफ्यातील बँक व्यवस्था उभारण्यास आपण समर्थ ठरू. यामुळे मुख्य उपकंपनी रिलायन्स कॅपिटलवरील कर्जभारही एक चतुर्थाश प्रमाणात कमी होईल. रिझव्र्ह बँकेच्या अटींनुसार या बँकेची पुढील तीन वर्षांत स्वतंत्ररीत्या भांडवली बाजारात नोंदणीही करण्यात येईल. या बँकेचा लाभ कंपनीच्या १२ लाख भागधारकांना निश्चित होईल. रिलायन्स कॅपिटलचे स्वतंत्र अस्तित्व बँक प्रत्यक्षात आल्यानंतरही कायम असेल, असेही ते म्हणाले.
रिलायन्स कॅपिटलवर सध्या २० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. अंबानी यांच्या म्हणण्यानुसार बँक यंत्रणा अस्तित्वात आल्यानंतर ते ५ हजार कोटी रुपयांवर येणार आहे. समूहातील या उपकंपनीमार्फत विमा, म्युच्युअल फंड, रोखे व्यवहार आदी व्यवसायही केले जातात. विमा व्यवसायातील जपानच्या निप्पॉनबरोबरची भागीदारी अधिक विस्तृत करण्याच्या प्रयत्नातही रिलायन्स कॅपिटल कंपनी आहे. बँकेसाठी कंपनी निप्पॉनसह जपानच्याच सुमिटोमो मित्सुई ट्रस्ट बँकेबरोबर भागीदारी करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स कॅपिटलने गेल्या आर्थिक वर्षांत ७७ टक्के नफ्यातील वाढ नोंदविली आहे. रिलायन्स कॅपिटलमार्फत पवन ऊर्जा क्षेत्रात १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनी हे क्षेत्र चीनच्या मिन्ग यान्ग वाईन्ड पॉवर समूहामार्फत विकसित करत आहे. समूह दूरसंचार क्षेत्रातील उपकंपनीचा हिस्सा विक्री करण्याच्या मनस्थितीतही आहे.