म्युच्युअल फंड व्यवसाय संपादण्यासाठी रिलायन्स कॅपिटलचे भागीदार निप्पॉनला आर्जव

मुंबई : अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील उद्योगसमूहातील अग्रणी कंपनी रिलायन्स कॅपिटलने गुरुवारी आपली विदेशी भागीदार कंपनी निप्पॉन लाइफ इन्शुरन्सला मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायातील आपला संपूर्ण ४२.८८ टक्के हिस्सा संपादित करण्याचे आर्जव केले आहे. कर्जाचे प्रचंड ओझे असलेल्या आणि तुरुंगवास टाळण्यासाठी थकीत देणी लवकरात लवकर चुकती करण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून तंबी मिळालेल्या अनिल अंबानी आणि त्यांच्या समूहासाठी हा व्यवहार फलद्रूप होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी ‘रिलायन्स निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट’मध्ये सध्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल आणि जपानी भागीदार निप्पॉन लाइफ इन्शुरन्सचा प्रत्येकी ४२.८८ टक्के भांडवली वाटा आहे. आपला संपूर्ण ४२.८८ टक्क्य़ांचा भांडवली हिस्सा निप्पॉनने खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे, रिलायन्स कॅपिटलने गुरुवारी भांडवली बाजाराला नियमानुसार सूचित करणारे टिपण दिले. ‘रिलायन्स निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट’मध्ये अनिल अंबानीप्रणीत रिलायन्स समूहाने कर्जभार कमी करण्यासाठी आपल्या अनेक कंपन्यांच्या मालमत्तांच्या विक्रीचे धोरण अनुसरले असून, गुरुवारी टाकले गेलेले पाऊल याचेच द्योतक आहे. उल्लेखनीय म्हणजे बुधवारीच न्यायालयाच्या अवमानप्रकरणी अनिल अंबानी आणि दोन अधिकाऱ्यांना दोषी ठरवून, सर्वोच्च न्यायालयाने एरिक्सन या दूरसंचार सामग्री पुरवठादार कंपनीची रिलायन्स कम्युनिकेशन्सने थकविलेली ५५० कोटी रुपयांची देणी चार आठवडय़ांमध्ये चुकती करावी अथवा तुरुंगवासाची तयारी ठेवावी, असा सज्जड आदेश दिला आहे.

हा व्यवहार मार्गी लागल्यास, विदेशी मालकी असलेले निप्पॉन हे भारतातील सर्वात मोठे म्युच्युअल फंड घराणे बनू शकेल. त्याचवेळी   यातून रिलायन्स कॅपिटलला १८ हजार कोटींच्या थकीत कर्जाचा भार जवळपास ४० टक्क्य़ांनी हलका करता येईल.

एरिक्सनचे २६० कोटी फेडण्यासाठी आरकॉमची कर्जदात्या बँकांना विनवणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून तडाखा मिळाल्यानंतर, रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) गुरुवारी स्वीडिश दूरसंचार कंपनी एरिक्सनची देणी चुकती करण्यासाठी पावले टाकली. कर्जदात्या बँकांना खात्यातील २६० कोटी रुपये खुले करावेत, अशी विनवणी कंपनीकडून करण्यात आली. चार आठवडय़ात सर्व ५५० कोटींची देणी चुकती करा अथवा तुरुंगात जायची तयारी ठेवा, अशी तंबीच बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने आरकॉमचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि अन्य दोन अधिकाऱ्यांना दिली आहे. आरकॉमच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११८ कोटी रुपयांची रक्कम सर्वोच्च न्यायालयाकडे जमा करण्यात आली असून, एरिक्सनची सर्व देणी चुकती केली जातील. त्यासाठी उर्वरित २०० कोटींची रक्कमही लवकरच उभी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समभागांना मात्र तेजी अवसर

थकीत देणी फेडण्यासाठी म्युच्युअल फंड व्यवसायामधील सर्व हिस्सा विकण्याची तयारी दाखविणाऱ्या रिलायन्स कॅपिटलमुळे एकूणच अनिल अंबानी यांच्या वित्त क्षेत्रातील समभागांनी गुरुवारी भांडवली बाजारात तेजीचा सूर गवसला. मोठय़ा मागणीसह खुद्द रिलायन्स निप्पॉन लाईफ अ‍ॅसेट मॅनेजमेंटचा समभाग जवळपास २० टक्क्यांपर्यंत वधारला.

रिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसी     रु. १८७.०५    +१९.९८%

रिलायन्स कॅपिटल                            रु. १६१.२०    +११.१३%

रिलायन्स होम फायनान्स                  रु. २७.३५     +९.८४%

कर्जभार हलका होणार..

’  हा व्यवहार मार्गी लागल्यास, विदेशी मालकी असलेले ते भारतातील सर्वात मोठे म्युच्युअल फंड घराणे बनेल.

’  यातून रिलायन्स कॅपिटलला १८ हजार कोटींच्या थकीत कर्जाचा भार जवळपास ४० टक्क्य़ांनी हलका करता येईल

’  या प्रस्तावित विक्री व्यवहाराच्या परिणामी, निप्पॉनला अतिरिक्त समभागांच्या खरेदीसाठी खुला प्रस्ताव आणणे बंधनकारक ठरेल

’  निप्पॉनकडे संपूर्ण हिस्सा व नियंत्रण हक्क जाणार असल्याने बाजारभावापेक्षा अधिमूल्यासह हा व्यवहार मार्गी लागू शकेल