रिलायन्स कम्युनिकेशन्सने आपल्या प्री-पेड मोबाइलधारकांचे कॉल दर येत्या आठवडय़ापासून २० टक्क्यांनी महाग केले आहेत. यंदाच्या मोसमात दरवाढीसाठी प्रथमच पुढाकार घेणाऱ्या या कंपनीने कॉल दर प्रति सेकंद १.५ पैशांवरून १.६ पैसे केले आहेत. ही वाढ ७ टक्क्यांची आहे. तर विविध सवलत योजनांवरील दर २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. वाढीव दरांची अंमलबजावणी देशव्यापी असून ती २५ एप्रिलपासून लागू होणार आहे.
नव्या दररचनेनुसार, सवलतीच्या दर योजनांचे दर १७ ते २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. याअंतर्गत यापूर्वी १०० मिनिटांसाठीची एसटीडी सुविधा आता ८० मिनिटांसाठी करण्यात आली आहे. तर अन्य योजनांवरीलही लोकल तसेच इंटरनेटसाठीची मिनिटे १०० ते ५०० मिनिटांनी कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता त्यांचे वाढलेले दर १७ टक्क्यांहून अधिक आहेत. चौथ्या स्थानावरील कंपनीचे देशभरात ११.७० कोटी मोबाइलधारक आहेत.
कंपनीमार्फत सध्या दिले जात असलेल्या मोफत तसेच सवलतीतील मिनिट दर काही प्रमाणात कमी करण्यासाठी यंदाच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीप सिंग यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे प्रति मिनिटामागे मिळणारा कंपनीचा महसूल येत्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसून येईल, असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला.