मुंबई : किरकोळ विक्री, दूरसंचार, तेल व वायू व्यवसायाच्या जोरावर रिलायन्स समूहाने नुकत्याच संपलेल्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत सर्वाधिक ११,२६२ कोटी रुपयांचा नफा नोंदविला असून वार्षिक तुलनेत त्यात यंदा १८.६ टक्के वाढ झाली आहे.

कंपनीबरोबरच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नफा नोंदविणारी रिलायन्स कंपनी देशातील उद्योग क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीने जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यान १०,३६२ कोटी रुपयांचा नफाही या रूपात मागे टाकला आहे. सर्वाधिक नफ्याची नोंद इंडियन ऑइलने जानेवारी-मार्च २०१३ मध्ये १४,५१२.८१ कोटी रुपये अशी केली होती.

गेल्या तिमाहीत २.४६ कोटी नवे ग्राहक जोडणाऱ्या समूहातील रिलायन्स जिओला सप्टेंबरअखेर ९९० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीची ग्राहकसंख्या आता ३५.५ कोटींवर गेली आहे. कंपनीच्या किरकोळ विक्री व्यवसायातही यंदा नफा वाढ नोंदली गेली आहे. तर तेल व वायू व्यवसायातून होणारा लाभ प्रति पिंप खनिज तेल ९.४ डॉलपर्यंत वाढला आहे.