रिलायन्स इंडस्ट्रीजने कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील ‘केजी-डी६’ साठय़ातील तेल उत्पादनाचा नाद सोडून देताना, तेथून उत्पादन कायमचे गुंडाळत असल्याचा शुक्रवारी निर्णय घेतला.

कृष्णा-गोदावरी खोऱ्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने एकूण १९ तेल आणि वायू साठे विकसनासाठी हाती घेतले आहेत. यापैकी डी६ मधून तेलाचे उत्पादन शून्यवत झाले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या खोऱ्यातील तेल साठे संशोधित झालेला एकमेव डी२६ हा कप्पा असून, तेथून रिलायन्सने सप्टेंबर २००८ पासून उत्पादन सुरू केले आहे. या व्यतिरिक्त धीरूभाई-१ आणि धीरूभाई-३ (डी१ आणि डी३) मधून नैसर्गिक वायूचे उत्पादन एप्रिल २००९ पासून सुरू आहे.

केजी-डी६ मधून १७ सप्टेंबरपासून उत्पादन कायमचे बंद करण्यात आल्याचे कंपनीने संबंधित सरकारी विभागाला कळविले आहे. कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील साठय़ाचे उत्खनन आणि उत्पादन हे रिलायन्ससह, ब्रिटिश पेट्रोलियम आणि कॅनडाच्या निको या कंपन्यांकडून अनुक्रमे ६०:३०:१० अशा हिस्सेदारीत संयुक्तपणे सुरू आहे.