मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने उत्पन्नाच्या बाबतीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे अकरा वर्षांपूर्वी रिलायन्सचे उत्पन्न इंडियन ऑइलच्या उत्पन्नापेक्षा निम्मे होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचे निव्वळ उत्पन्न ४४.८ टक्क्यांनी वाढून ५.६७ लाख कोटी रुपये झाले आहे. याच कालावधीत इंडियन ऑइलचे निव्वळ उत्पन्न २८.०३ टक्क्यांनी वाढून ५.२८ लाख कोटी रुपये झाले, असे ब्लूमबर्गचा डेटा सांगतो.

यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजने निकषांच्या सर्व स्तरांवर म्हणजे उत्पन्न, नफा व बाजार मूल्य या तिन्ही गोष्टींमध्ये अग्रस्थान पटकावले आहे. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्व शेअर्सचे बाजार मूल्य ८.४ लाख कोटी रुपये होते. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकात येणाऱ्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य ८६.४ लाख कोटी रुपये असून जवळपास १० टक्के हिस्सा तर रिलायन्सचाच आहे.

मे च्या सुरूवातीला उच्चांक गाठलेल्या रिलायन्सच्या शेअरने नंतरचे १० दिवस विक्री अनुभवली, परंतु नंतर त्यात पुन्हा ७.५ टक्क्यांची वाढ झाली असून आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सगळ्यात जास्त आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकत्रित निव्वळ नफ्याच्या बाबतीतही ३९,५८८ कोटी रुपयांसह विक्रमी उंची गाठली आहे.