एम्बाइबमध्ये ७३ टक्के हिस्सा खरेदी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने तंत्रज्ञानाधारित शिक्षणप्रसारासाठी कार्यरत कंपनी ‘एम्बाइब’मध्ये १८० अमेरिकी डॉलर म्हणजे सुमारे १,१७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा निर्णय गुरुवारी घोषित केला. ही गुंतवणूक तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, त्या बदल्यात कंपनीतील ७२.६९ टक्के भांडवली हिस्सा रिलायन्सकडे येणार आहे.

रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांच्या पुढाकारातून हा धोरणात्मक गुंतवणुकीचा व्यवहार संपन्न झाला आहे. भारतातील विस्तारत असलेल्या शिक्षणक्षेत्राला जागतिक दर्जाशी तुल्यबळ करण्याबरोबरच, तंत्रज्ञानाच्या अवलंबनातून शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी रिलायन्सच्या वचनबद्धतेतून हे गुंतवणुकीचे पाऊल टाकले गेले आहे, असे अंबानी यांनी एम्बाइबमधील गुंतवणुकीवर प्रतिक्रिया दिली. या गुंतवणुकीतून रिलायन्स देशातील १९ लाख शाळा आणि ५८,००० विद्यापीठांशी नाते जोडू इच्छिते अशी त्यांनी पुस्ती जोडली. शिक्षणक्षेत्राला तंत्रज्ञानावर मंचावर आणण्यासाठी सेवा पुरवठादार एम्बाइबचे २०१२ मध्ये कार्यान्वयन झाले आणि आज कंपनीच्या मंचाशी केजी ते १२वी शिक्षणातील ६० शिक्षण संस्था जुळलेल्या आहेत.