महिन्यात १.६० कोटी नवे मोबाइलधारक जोडल्याचा दावा

व्यवसाय पदार्पणातच रिलायन्स जिओने ठराविक कालावधीत सर्वाधिक दूरसंचार ग्राहक जोडल्याचा दावा करण्यात आला आहे. सप्टेंबर या एकाच महिन्यात १.६० कोटी नवे मोबाइलधारक जोडून कंपनीने जागतिक विक्रम केल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओच्या प्रत्यक्ष व्यवसायास सप्टेंबरच्या सुरुवातीला (५ सप्टेंबर) सुरुवात झाली. ४जी तंत्रज्ञानावर सेवा देणाऱ्या या कंपनीने गेल्या २६ दिवसात १.६० कोटी ग्राहक मिळविल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अन्य स्पर्धक कंपन्यांनी त्यांच्या महिन्याभरात जोडलेल्या नव्या ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे रिलायन्स जिओने नमूद केले आहे. कंपनीच्या ‘जिओ वेलकम ऑफर’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल अंबानी यांनी नव्या ग्राहकांचे आभारही मानले आहेत. कंपनीचे अल्पावधीतील १० कोटी मोबाईलग्राहक मिळविण्याचे लक्ष्य आहे. प्रायोगिक तत्त्वावर कंपनीने १५ लाख जिओ सिम देऊ केले होते. ऑक्टोबरअखेपर्यंत ही संक्या ३.५० कोटी होण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने ऑगस्टमध्ये ७ लाख नवे ग्राहक जोडत एकूण संख्या २५.७५ कोटींपल्याड नेली आहे. २० कोटी ग्राहकसंख्येसह व्होडाफोन दुसऱ्या स्थानावर आहे. १७.७० कोटींसह आयाडिया सेल्युलर तिसरी मोठी कंपनी आहे.

एअरसेल विलिनीकरणामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्स सप्टेंबरमध्ये तिसऱ्या स्थानावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अ‍ॅपलच्या आयफोन७ची भारतात गेल्या आठवडय़ात उपलब्धतता झाल्यानंतर रिलायन्स जिओच्या मंचावर पहिला आयफोन७ मुंबईतील शिवानी सिंह यांना मिळाला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे आकाश अंबानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जिओ वेलकम ऑफर’अंतर्गत देण्यात आला. यानुसार १५ महिन्यांकरिता जिओ व आयफोन७ धारकांना मोफत कॉल सेवा मिळणार आहे. यामध्ये २० जीबी डेटा व मोफत एसएमएस यांचाही समावेश आहे. कंपनीने आयफोन ७ व आयफोन ७ प्लस फोन उपलब्ध केले आहेत