मुंबई : किरकोळ विक्री आणि दूरसंचार व्यवसायाच्या जोरावर भांडवली बाजार मूल्याबाबत देशात अव्वल असलेल्या रिलायन्स समूहाने नुकत्याच संपलेल्या तिमाहीत एकेरी अंक नफावृद्धी नोंदविली आहे.

तेल व वायू व्यवसायापासून समूहाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या रिलायन्सच्या एकूण लाभात ग्राहकपयोगी व्यवसायाचा वाटा तिसरा आहे. मात्र कंपनीच्या मुख्य – तेल व वायू व्यवसायातील लाभ (जीआरएम) यंदा कमी झाला आहे.

सप्ताहअखेर भांडवली बाजाराचे व्यवहार संपुष्टात आल्यानंतर रिलायन्सने वित्त वर्ष २०१९-२० च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीचे निष्कर्ष जाहीर केले. यानुसार, कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत नफ्यातील ६.८ टक्के वाढ नोंदविली आहे. तर तेल व वायू व्यवसायातील नफा १७.०५ टक्क्य़ांनी वाढला आहे.

समूहाने तिमाहीत किरकोळ विक्री क्षेत्रात दालनविस्तार तसेच मोबाइल ग्राहकसंख्येत वाढ नोंदविली आहे. समूहाच्या एकूण उलाढालीत या दोन व्यवसायाचा हिस्सा तिमाहीत २५ टक्क्य़ांवरून ३२ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. जूनअखेर किरकोळ विक्री दालनांची संख्या १०,६४४ वर तर मोबाइलग्राहक ३३.१२ कोटींवर पोहोचले आहेत. किरकोळ विक्री व्यवसायातील नफा ७० टक्क्य़ांनी वाढला आहे. तर मोबाइल व्यवसायाचा नफा ८९१ कोटी रुपयांवर गेला आहे.

रिलायन्सच्या मनोरे व्यवसायात ब्रुकफिल्डची २५ हजार कोटींची गुंतवणूक

रिलायन्सच्या दूरसंचार मनोरे व्यवसायात ब्रुकफिल्डने २५,२१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. रिलायन्सच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रिअल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्जमध्ये ब्रुकफिल्डच्या टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टमार्फत गुंतवणूक होणार आहे. भागीदार उपकंपनीत रिलायन्सचा निम्म्याहून अधिक हिस्सा असेल, असे समूहामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

रिलायन्स जिओने एअरटेलला मागे टाकले

पदार्पणातच जवळपास मोफत सेवा देऊन सामान्यांनाही डेटावापराची सवय लावणाऱ्या रिलायन्स जिओने स्पर्धक भारती एअरटेलला मागे सारत मोबाइल ग्राहक संख्येतील दुसरे स्थान पटकावले आहे. मेअखेर कंपनीने ३२.२९ कोटी ग्राहकांच्या जोरावर देशातील २७.८० टक्के बाजारहिस्सा गाठला आहे.

भारती एअरटेलचे देशभरात ३२.०३ मोबाइल ग्राहक असून २७.५८ टक्के बाजारहिस्सा आहे. तर व्होडाफोन-आयडियाचे ३८.७५ कोटी ग्राहक व ३३.३६ टक्के बाजारहिस्सा आहे. रिलायन्स जिओने यंदाच्या मेमध्ये ८१.८० नवे मोबाइलग्राहक जोडले आहेत.

रिलायन्सने जिओ या नाममुद्रेसह भारतीय दूरसंचार क्षेत्रात सप्टेंबर २०१६ मध्ये प्रवेश केला. १९९५ पासून देशात असलेल्या एअरटेलचे व्होडाफोन-आयडिया विलिनीकरण होईपर्यंत ग्राहकसंख्येबाबत पहिले स्थान होते. आता रिलायन्स जिओमुळे तर कंपनी तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.