भांडवली बाजारात गुरुवारी पुन्हा रिलायन्स इंडस्ट्रीजची झेप ही ‘सेन्सेक्स’च्या मोठय़ा मुसंडीत सर्वाधिक योगदान देणारी ठरली. रिलायन्सच्या किराणा व्यवसायात विदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला असून, अ‍ॅमेझॉनलाही त्यात रस असल्याच्या चर्चेने या समभागाच्या बहारदार कामगिरीने प्रमुख निर्देशांकांना बळकटी दिली.

व्यवहारात ६४६.४० अंश झेप घेत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८ हजाराच्या पुढे, ३८,८४०.३२ वर पोहोचला. तर १७१.२५ अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११,५०० च्या नजीक, ११,४४९.२५ वर स्थिरावला.

रिलायन्स रिटेलमधील जवळपास दोन टक्के हिस्सा अमेरिकेच्या सिल्व्हर लेक पार्टनर्सला विकल्यानंतर आता या कंपनीतील ४० टक्के हिस्सा अ‍ॅमेझॉनला विकला जाण्याची चर्चा सुरू आहे. गुरुवारी बाजाराने याची सकारात्मक दखल निर्देशांकातील जवळपास दीड टक्के  उसळीने घेतली.

रिलायन्ससह सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सीमेंट, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आदीही वाढले.  मिड कॅप व स्मॉल कॅप जवळपास सव्वा टक्क्यापर्यंत वाढले. तर क्षेत्रीय निर्देशांकांत दूरसंचार, पोलाद क्षेत्रीय निर्देशांक १.४० टक्क्यांपर्यंत वाढले. ऊर्जा, तेल व वायू, वित्त, भांडवली वस्तू ६.२६ टक्क्यांपर्यंत घसरले.

२०० अब्ज डॉलरच्या बाजार भांडवलाचा विक्रम

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने मोठी मागणी आल्याने गुरुवारी विक्रमी मूल्यस्तराची नोंदवला. दिवसाच्या व्यवहारात ८.४५ टक्क्यांनी उंचावत तो २,३४३.९० वर पोहोचला. त्यामुळे बाजार भांडवलात २०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठणारी रिलायन्स ही देशातील पहिली कं पनी ठरली आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावरील टीसीएस आणि रिलायन्स दरम्यानची दरी यातून अधिकच विस्तारली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज :

रु. २,३१४.६५    +७.१०%