तिमाहीत नफ्यातील घसरण नोंदविणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाचा मोठा दबाव सप्ताहारंभीच्या व्यवहारातच भांडवली बाजारात दिसून आला. मात्र सत्रअखेर बँक तसेच वित्त समभागांनी नोंदविलेल्या खरेदी मागणीमुळे सेन्सेक्स व निफ्टीला गेल्या सलग तीन व्यवहारातील घसरण थोपवता आली.

सेन्सेक्स १४३.५१ अंशांच्या वाढीसह ३९,७५७.५५८ वर स्थिरावला. तर निफ्टी २६.७५ अंश कमाई करून ११,६६९.१५ पर्यंत थांबला. रुपया, खनिज तेल किमतीत घसरणीनंतरही आशियाई बाजारांच्या तेजीला स्थानिक बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी प्रतिसाद दिला.

शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही निव्वळ नफ्यातील १५ टक्कय़ांच्या घसरणीची प्रतिक्रिया बाजारात सोमवारच्या व्यवहारात उमटली. कामकाजाच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात ८ टक्क्य़ांनी घसरण झाली. मात्र बाजार बंद होताना समभाग काहीसा सावरला. तरी तो ५.५४ टक्क्य़ांनी खाली येऊन १,९४०.५० रुपयांवर बंद झाला. कंपनीला बाजार मूल्यात तब्बल ६८,०९३.५२ कोटींचा तोटा सोसावा लागला असून, ते १३.२१ लाख कोटींवर रोडावले आहे.

रिलायन्सच्या समभागातील घसरणीत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत बातम्यांचा परिणाम दिसला. अंबानी यांना गंभीर आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर लंडन येथे शस्त्रक्रिया झाल्याचे चर्चिले जात आहे. तसेच अंबानी कुटुंबीयांची मालकी असलेला आयपीएल क्रिकेट संघ ‘मुंबई इंडियन्स’च्या सामन्यांना कुटुंबीयांपैकी कोणाचीही हजेरी नसण्यामुळेही बाजारात या वावटळी उठत आहेत. या चर्चा-वितर्काना पूर्णविराम देणारी अधिकृत घोषणा होणार होती, परंतु सोमवारी उशिरापर्यंत कंपनीकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही.