रिलायन्सचे व्यवसायातून निर्गमन; जपानी कंपनीचा ६,००० कोटींचा व्यवहार पूर्ण

मुंबई : जपानमधील सर्वात मोठी आयुर्विमा आणि जागतिक पातळीवरील अग्रगण्य वित्तीय सेवा कंपनी असलेल्या निप्पॉन लाइफ इन्शुरन्सने सोमवारी रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या समभागांचे अधिग्रहण केल्याचे जाहीर केले. या अधिग्रहणानंतर रिलायन्स म्युच्युअल फंड निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड या नावाने ओळखला जाईल.

कंपनीच्या फेरबदलासह सादर करण्यात आलेल्या नवीन नाममुद्रेच्या अनावरणप्रसंगी मुंबईत सोमवारी निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष हिरोशी शिमीझू आणि निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का आदी उपस्थित होते. निप्पॉन लाइफ इन्शुरन्सला जागतिक स्तरावरील १३० वर्षांचा मालमत्ता आणि विमा व्यवसायाचा अनुभव असून निप्पॉन लाइफ इन्शुरन्स ७ अब्ज अमेरिकी डॉलर मालमत्तेचे व्यवस्थापन करते.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाबरोबर तिची उपकंपनी रिलायन्स कॅपिटलच्या माध्यमातून निप्पॉनने देशातील वित्त, विमा तसेच निधी व्यवस्थापन क्षेत्रात शिरकाव केला होता. यासाठीच्या व्यवसाय भागीदारीत रिलायन्सचा २६ तर निप्पॉनचा ७४ टक्के हिस्सा होता. कर्जभार असलेल्या रिलायन्सने आपला संपूर्ण हिस्सा जपानी भागीदारी कंपनीला ६,००० कोटी रुपयांना विकून या क्षेत्रातून निर्गमन केले.