म्युच्युअल फंड उद्योगातील, फंड गंगाजळी व्यवस्थापनातील तिसरी मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनी नुकतीच भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली. या प्राथमिक विक्रीतून उभारलेल्या भांडवलाचा विनियोग करण्याचा मनोदय कंपनीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू व्यापक यांनी लोकसत्ताशी बातचीत करताना व्यक्त केला

नुकतीच भागविक्री करून तुम्ही तुमच्या कंपनीची भांडवली बाजारात नोंदणी केली. भागविक्री करून मिळालेल्या निधीचा उपयोग करण्याबाबत भविष्यातील काय योजना आहेत?

सेबीच्या मार्गदर्शकतत्वांना अनुसरून आम्ही हा निधी वापरणार आहोत. पहिली गोष्ट शाखांचा विस्तार करण्यात येणार असून चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत आम्ही १५० नवीन शाखा उघडण्याचे लक्ष्य निश्चित केले असून १०० पेक्षा अधिक शहरात आम्ही या शाखांमार्फत व्यवसायाचे जाळे विणणार आहोत.

या नवीन शाखा मुख्यत्वे लहान शहरात असतील. ही ठिकाणे देशातील १५० मोठे जिल्हे वगळून उर्वरित भारतातील ठिकाणी असतील. जेणेकरून आमचा प्रयत्न म्युच्युअल फंड आणि गुंतवणूकदार यांच्यातील अंतर कमी करणे हा असेल.

या निमित्ताने मी आपल्याला काही आकडेवारी सागू इच्छितो. २००८ ते २०१७ या १० वर्षांत म्युच्युअल फंडांची मालमत्ता वाढली. खाती वाढली; परंतु खाती असलेल्या पॅनच्या संख्येत वाढ झाली नाही. म्युच्युअल फंडांच्या मालमत्ता पाच पटींनी वाढूनही पॅनची संख्या दुप्पट झालेली नाही. याचाच अर्थ तेच गुंतवणूकदार आपली अधिकाधिक बचत म्युच्युअल फंडात करत आहेत.

याची नेमकी काय कारणे आहेत?

पहिले कारण अर्थसाक्षरतेचा अभाव. आणि दुसरे कारण गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड प्रतिनिधी किंवा म्युच्युअल फंडांच्या शाखा यांच्यातील अंतर हे आहे. आता अर्थसाक्षरता वाढत असून मागील 10 वषाद्द्रत पहिल्यांदा नव्याने १ कोटी नवीन गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरवात केली आहे.

प्रामुख्याने ज्यांनी आजपर्यंत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नाही अशा गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या परिघात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्युच्युअल फंडाकडे एका दिवसासाठी गुंतवणूक करण्यासाठी लिक्वीड फंडापासून ते अनेक वर्ष गुंतवणूक करण्यासाठी निवृत्त फंडासारख्या निवृत्त योजना आहेत. म्युच्युअल फंडाकडे इतका विस्तृत पट असल्याने साहजिकच अनेक नवगुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला उत्सुक आहेत. या गुंतवणूकदारांच्या काही गरजा आहेत. जसे की, समोरसमोर बसून त्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. गरज आहे.

यावर कशी मात कराल?

गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड यांच्यातील अंतर कमी करायचे असेल तर तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य आहे. मुख्यत्वे नवीन गुंतवणूकदार ज्या अडचणींना तोंड देतात त्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. तंत्रज्ञानाच्या वापराचे बायोमेट्रीक केवायसी हे एक उदाराहण देता येईल. एसआयपीसाठी आम्ही ‘आधार’शी संलग्न ‘ई ओटीबीएम’ (इलेक्ट्रोनिक वन टाईम बँक मॅनडेट) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान भारतात आम्ही सर्वप्रथम उपयोगात आणले. त्यामुळे कागदी उपचारांची आवश्यकता भासत नाही.

काही प्रमाणात गुंतागुंतीची असलेली केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुविधा म्युच्युअल फंड विक्रेत्यांना लवकरच उपलब्ध करून देऊ. आज म्युच्युअल फंड गुंतवणुकीला सुरवात करण्यासाठी ‘केवायसी’ हा मोठा अडथळा आहे. आम्ही या अडथळ्यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. या सुविधेचा लाभ केवळ रिलायन्स म्युच्युअल फंडालाच होणार नसून केवायसीप्राप्त गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकेल.

ईशान्य भारतातील राज्यात किंवा भारताच्या दक्षिणेकडे आम्हाला व्यवसाय विस्तारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याशिवाय पर्याय नाही.

व्यवसाय विस्ताराच्या कंपनीच्या योजना काय आहेत?

व्यवसायविस्तार धोरणाचे दोन भाग आहेत. पहिला भाग आमच्या गुंतवणूकदारांना चांगली सेवा देता यावी यासाठी नवीन ‘कॉल सेंटर्स’सारख्या उपक्रमातून गुंतवणूकदार सेवेचा विस्तार करणे ज्यात नवीन ‘कॉल सेंटर्स’ सुरू करण्याबरोबरच सध्याच्या ‘कॉल सेंटर्स’ची क्षमता वाढविणे. व्यवसाय विस्ताराच्या संधी उपलब्ध झाल्यास योग्य मूल्यांकनात एखाद्या म्युच्युअल फंडाच्या अधिग्रहणाचा आम्ही नक्कीच विचार करू.

वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या बरोबरीने अनेक कंपन्या आमच्या गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या गरजा वैयक्तिक गुंतवणूकदारांपेक्षा वेगळ्या असल्याने त्यांच्यासाठीदेखील तंत्रज्ञानाचा वापरकरून त्यांचा गुंतवणूक विषयक गरजा पूर्ण करण्यावर आमचा भर राहील.

आमच्या व्यवसायाचा महत्वाचा भाग असलेले म्युच्युल फंड विक्रेते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांच्या व्यवसाय सुलभ व्हावा यासाठी आम्ही प्रयशील आहोत आणि लवकरच त्यांनासुद्धा डिजिटल सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे आम्हाला आजचे दिवस ज्यांच्यामुळे दिसले त्या म्युच्युल फंड विताराकांसाठी आमच्या अनेक योजना आहेत.

त्यापैकी एक योजना म्हणजे ‘प्रोस्पॅरिटी हब’ ही असून त्याची सुरवात आम्ही मुंबईतील बोरिवलीपासून केली आहे. ‘प्रोस्पॅरिटी हब’ अंतर्गत म्युच्युअल फंड वितरकांना आम्ही ३ तासांकरिता कार्यालयीन जागा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून या सेवेचा विस्तार अन्य शहरात करण्याचा आमचा प्रयत्न आहे.