वेगवेगळ्या १४ कंपन्यांकडून सुमारे साडेसात तास सुरू राहिलेल्या चढाओढीने बोली लावल्या गेलेल्या लिलाव प्रक्रियेत, कृष्णा गोदावरी-डी ६ या नैसर्गिक वायू साठ्याच्या पूर्वेकडील तटाच्या वायूच्या पुरवठ्यासाठी अखेर रिलायन्स ओ२सी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी देकार पटकावला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिची ब्रिटिश सहयोगी कंपनी बीपी यांनी बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातील या संशोधनातून मिळविलेल्या ५५ लाख घन मीटर प्रति दिन नैसर्गिक वायूसाठी ही लिलाव प्रक्रिया योजली होती. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रिलायन्सचे एक अंग असलेल्या ‘रिलायन्स ओ२सी’ने सर्वाधिक किमतीची बोली लावून यापैकी ३० घनमीटर प्रति दिन पुरवठ्याचे कंत्राट पटकावले आहे. उर्वरित हिश्शामध्ये रिलायन्स-बीपी यांनीच वायू विपणनासाठी स्थापलेली संयुक्त कंपनी इंडिया गॅस सोल्यूशन्स आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपन्यांनी प्रत्येकी  १० लाख घनमीटर प्रति दिन पुरवठ्याचे हक्क मिळविले आहेत. अदानी गॅस, आयआरएम एनर्जी, गेल आणि टोरेन्ट गॅस या अन्य कंपन्यांना यशस्वी बोली लावून किरकोळ स्वरूपात नैसर्गिक वायुपुरवठ्याचे हक्क मिळविले.

हायड्रोकार्बन्स महासंचालनालय अर्थात ‘डीजीएच’ने मान्यता दिलेल्या त्रयस्थ पक्षीय लिलाव मंचावर ही ऑनलाइन लिलाव प्रक्रिया गुरुवारी पार पडली. रिलायन्स-बीपी यांनी या व्यासपीठावर राबविलेली ही तिसरी ऑनलाइन लिलाव प्रक्रिया होती.