आगामी कालावधीत दूरसंचार हेच व्यवसायाचे खऱ्या अर्थाने इंधन असल्याचे वेळोवेळी सांगणाऱ्या अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मुख्य, तेल व रसायन उद्योगाला स्वतंत्र रूप देण्यात आले आहे. रिलायन्स समूहातील उपकंपनी म्हणून तेल व रसायन व्यवसाय यापुढे होणार असून त्यासाठी समूहाने अंतर्गत २५ अब्ज डॉलरचे कर्जही देऊ केले आहे.

मुकेश अंबानी यांचे वडील धीरुभाई अंबानी यांनी तेल व रसायन व्यवसायाद्वारे रिलायन्स समूूहाची स्थापना केली होती. मुकेश व अनिल अंबानी बंधूंच्या स्वतंत्र व्यवसाय निर्णयानंतर सुरुवातीचा दूरसंचार व्यवसाय धाकटय़ा बंधूंकडे आला. स्पर्धा करारातील अटी संपुष्टात आल्यानंतर मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुलांसह दूरसंचार तसेच किरकोळ विक्री व्यवसायाचा विस्तार केला.

येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत व्यवसाय पुनर्बाधणी प्रक्रिया पूर्ण होईल, असे रिलायन्सने स्पष्ट केले आहे. या माध्यमातून समूहावरील कर्जभार कमी होईल, असा दावाही करण्यात आला आहे. दरम्यान, या वृत्ताने कंपनीचे समभाग मूल्यही मंगळवारी वाढले.

हरित ऊर्जानिर्मितीवर भर देण्याचे स्पष्ट करत रिलायन्सने गेल्या वर्षी समूह किरकोळ विक्री तसेच दूरसंचार व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे जाहीर केले होते. परिणामी तेल व रसायन व्यवसायातील काही हिस्सा तिची या क्षेत्रातील भागीदार कंपनी सौदी आराम्कोकडे हस्तांतरितही केला होता.

इंधन निर्मितीशी संबंधित तेल व वायू निर्मिती क्षेत्र (केजी-डी६) तसेच वस्त्र व्यवसायाचा समावेश नव्या उपकंपनीत समावेश नसेल. तर नव्या बदलानंतर समूहाचा रिलायन्स रिटेलमधील हिस्सा ८५.१ टक्के व दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्स जिओमधील हिस्सा ६७.३ टक्के होईल.

किरकोळ इंधन उपकंपनीत रिलायन्सचा ५१ टक्के तर भागीदारी कंपनी बीपीचा उर्वरित ४९ टक्के हिस्सा असेल.