मुंबई : म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने घेतला आहे. समूहाच्या फंड व्यवसायातील जपानी भागीदाराने आता त्यावर संपूर्ण मालकी मिळविली आहे.

रिलायन्स निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट या कंपनीतील सर्व, ४२.८८ टक्के हिस्सा विकून रिलायन्स कॅपिटल या व्यवसायातून बाहेर पडली आहे. जपानच्या निप्पॉन लाइफ इन्शुरन्स या भागीदाराने हा संपूर्ण हिस्सा खरेदी केला आहे.

या मुच्युअल फंडामार्फत एप्रिल २०१९ पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, २.२५ लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन हाताळले जात आहे. फंड मालमत्तेत एचडीएफसी, आयसीआयसीआय म्युच्युअल फंडांबरोब अनिल अंबानी यांच्या कंपनीची स्पर्धा आहे. या म्युच्युअल फंडाने समूहातील चार कंपन्यांना ४२५ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.

नव्या व्यवहारामुळे कर्जभार ३३ टक्क्यांनी कमी होण्याची आशा रिलायन्स कॅपिटलने व्यक्त केली आहे. या माध्यमातून रिलायन्सला ६,००० कोटी रुपये मिळतील. प्रति समभाग २३० रुपये दराने निप्पॉन लाइफ इन्शुरन्सने खुल्या बाजारातून ही हिस्सा खरेदी केली आहे. नोव्हेंबर २०१७ रोजी भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारे हे देशातील पहिले म्युच्युअल फंड घराणे आहे.

कंपनीचे बाजार भांडवल सध्या १३,९०० कोटी रुपयांचे आहे. फंडातील जपानी भागीदार निप्पॉन लाइफ इन्शुरन्स ही १३० वर्षे जुनी कंपनी आहे. २०१२ मध्ये तिने भारतातील म्युच्युअल फंड उद्योगात शिरकाव केला.