करोनाकाळात अनेक उद्योग-व्यवसायांना जाचक ठरला असला तरी, दूरसंचार सेवा क्षेत्रासाठी बंपर फायद्याचा ठरला आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गुरूवारी घोषित केलेल्या एप्रिल-जून तिमाहीतील १३,२४८ कोटी रुपयांच्या विक्रमी निव्वळ नफ्याने याचेच प्रत्यंतर दिले.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एप्रिल-जून २०२० तिमाहीतील नफ्यातील वाढ मागच्या वर्षांच्या तुलनेत ३०.६ टक्क्य़ांनी अधिक आहे. या आधी ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ तिमाहीत कंपनीने ११,६४० कोटी असा इतिहासातील सर्वोच्च नफा नोंदविला होता. एकूण नफ्यात रिलायन्सचेच अंग असलेल्या ‘जिओ’ सेवेच्या २,५२० कोटी रुपयांच्या नफ्याचे योगदान आहे. घरून काम करण्याच्या या काळात डेटा सेवेचा वापर ३० टक्के वाढल्याने नफ्याचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल १८३ टक्क्य़ांनी वाढले आहे. गतवर्षी या तिमाहीत जिओचा नफा ८९१ कोटींचा होता. शिवाय ‘जिओ’ने १३ जागतिक गुंतवणूकदारांकडून १५२,०५६ कोटींचे भांडवल उभारले आहे.

इंधन विक्री क्षेत्रातील व्यवसायाचा ४९ टक्के हिस्सा बीपीला विकून रिलायन्स इंडस्ट्रीज सरलेल्या तिमाहीच्या काळात ७,६२९ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले. यातून निर्धारीत लक्ष्यापूर्वीच कंपनीला कर्जमुक्त होता आले आहे.