बुधवारच्या विश्रांतीनंतर, भांडवली बाजारात निर्देशांकांची दौड गुरुवारी पुन्हा त्याच गतीने सुरू राहिली आणि सेन्सेक्सने चार महिन्यांपूर्वी मागे सोडलेली ३८ हजारांची पातळी पुन्हा गाठली. तर निर्देशांकात भारदस्त स्थान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागानेही त्याचे सार्वकालिक उच्चांक नोंदवत या तेजीचे नेतृत्त्वस्थान पटकावले.

काहीशी नरमाईने सुरुवात, मात्र उत्तरार्धात वेग पकडत सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहाराची अखेर २६८.९५ अंशांची कमाई करीत ३८,१४०.४७ या पातळीवर केली. ५ मार्च २०२० नंतरची सेन्सेक्सचा हा सर्वोच्च स्तर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही बुधवारच्या तुलनेत ८२.८५ अंशांची भर घालत, ११,२१५.४५ या स्तरावर दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला.

निर्देशांकांच्या मुसंडीत सर्वाधिक योगदान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाचे राहिले. २.८२ टक्क्य़ांच्या वाढीसह या समभागाने २,०६०.६५ या इतिहासातील सर्वोच्च शिखराला गाठले. गुगल, फेसबुक, इंटेलपाठोपाठ अ‍ॅमेझॉन या जागतिक कंपनीचे रिलायन्स रिटेलमध्ये दिसत असलेले गुंतवणूक स्वारस्य समभागाच्या मुसंडीस कारणीभूत ठरले.