फेसबुकच्या हिस्सा खरेदीने रिलायन्सला मिळालेल्या बळाचा लाभ बुधवारी भांडवली बाजारालाही झाला. व्यवहारात मंगळवारच्या तुलनेत सेन्सेक्स ७४२.८४ अंशांनी वाढून मुंबई निर्देशांक ३१,३७९.५५ वर पोहोचला. तर २०५.८५ अंश वाढीसह निफ्टी ९,१८७.३० पर्यंत स्थिरावला. सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभागच अव्वल ठरला. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी केवळ ओएनजीसी, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी लिमिटेड, पॉवरग्रिड हे चार समभागच तेजीच्या यादीत राहिले.

रुपयाचा विक्रमी तळ

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य बुधवारी पुन्हा त्याच्या विक्रमी तळापर्यंत पोहोचले. परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलनात १५ पैशांची आपटी नोंदविली गेली. मंगळवारच्या ७६.८३ तुलनेत रुपया बुधवारी ७६.६८ पर्यंत खाली आला. भांडवली बाजारात तेजी असताना खनिज तेलाच्या घसरत्या किंमतीने मात्र परकीय चलन विनिमय मंचावर चिंता निर्माण केली. ७६.८६ ने बुधवारच्या सत्राची सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ७६.८८ पर्यंत आपटला. दिवसअखेर तो जवळपास याच स्तरावर स्थिरावला.