मालमत्ता लिलावासाठी प्रशासकांचे पाऊल

मुंबई : घोटाळेग्रस्त पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियुक्त प्रशासकांनी, एचडीआयएल समूहाच्या मालकीची दोन विमाने आणि आलिशान नौकेच्या लिलावासाठी पहिले पाऊल टाकताना, या मालमत्तांच्या मूल्यनिर्धारणासाठी सल्लागाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव शुक्रवारी सादर केला.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग यांच्या एचडीआयएल समूहाने बँकेतून तब्बल ६,५०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते थकविले आहे. बँकेच्या संचालक व अधिकाऱ्यांशी संगनमत करून, शेकडो बनावट खात्यांद्वारे हा लबाडीचा व्यवहार करण्यात आला आहे. या परिणामी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणून, संचालक मंडळाच्या बरखास्तीसह रिझव्‍‌र्ह बँकेने प्रशासकाच्या हाती कारभार सोपविला. आता कर्जबुडव्या एचडीआयएलच्या प्रवर्तकांच्या मालमत्ता विकून, ठेवीदारांचे पैसे चुकते करण्याचे प्रशासकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. चालू महिन्याच्या प्रारंभी प्रशासकांनी या मालमत्तांसाठी सल्लागार, प्रक्रिया समन्वयकांसाठी पात्र संस्था, व्यक्तींकडून निविदाही मागविल्या आहेत.

नोव्हेंबरमध्ये सत्र न्यायालयाने पीएमसी बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांना एचडीआयएलच्या मालकीची डसॉल्ट फाल्कन २०० आणि चॅलेंजर ३०० अशी दोन विमाने आणि फेरेटी ८८१-एचटी ही आलिशान नौका विकण्याला हिरवा कंदील दिला आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह तपास करीत असलेल्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांनी वाधवान यांच्या जप्त मालमत्तांच्या लिलावाला त्यांची हरकत नसल्याचे न्यायालयास सांगितले आहे. वाधवान यांच्या मालकीच्या विमाने व नौका याव्यतिरिक्त १५ आलिशान मोटारी, एक सात आसनी स्पीड बोटही ईडीने जप्त केली आहे.