विदेशी भागीदार ‘इन्व्हेस्को’ला हिस्सा विकून
भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात निभाव लागत नाही म्हणून विदेशी मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या अंग काढून घेण्याच्या सुरू असलेल्या मालिकेत, रेलिगेअर एंटरप्राइज या भारतीय वित्तीय सेवा समूहाचे मात्र उलटे पाऊल पडले आहे. रेलिगेअर इन्व्हेस्को एएमसी या संयुक्त कंपनीमधील आपला सर्व ५१ टक्के हिस्सा आणि नियंत्रण ‘रेलिगेअर’ने तिची विदेशी भागीदार इन्व्हेस्कोला विक्री करीत असल्याची गुरुवारी घोषणा केली.
गोल्डमन सॅक्सचे निर्गमन ताजे असताना, गेल्या तीन वर्षांत सहा विदेशी कंपन्यांनी देशातील म्युच्युअल फंड व्यवसायातून माघार घेतली आहे. विदेशी भागीदारांचे रिक्त स्थान हे भारतीय प्रवर्तकच भरून काढत असून, रेलिगेअरचे मात्र या प्रघाताविरुद्ध पाऊल पडले आहे.
फंड व्यवसायाकडे पाठ फिरविण्याचे नेमके कारण मात्र रेलिगेअरने अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही. तथापि, गेला वर्षभराचा कालावधी म्युच्युअल फंड उद्योगासाठी खूपच बहराचा असतानाही, आपल्या फंड गंगाजळीत फारशी उत्साहवर्धक वाढ नसणे, हेच यामागे कारण असल्याचे उद्योगक्षेत्रातील जाणकारांचा कयास आहे.
रेलिगेअर इन्व्हेस्कोच्या विविध योजनांमधील एकूण गुंतवणूक गंगाजळी (मालमत्ता) ही सप्टेंबर २०१५ अखेर २१,५९३ कोटी रुपये होती. मार्च २०१५ अखेर २१,००९ कोटी रुपयांच्या पातळीवरून ती नाममात्र वाढली आहे. किंबहुना, अन्य सर्व फंड घराण्यांकडील गुंतवणूक ओघ भरभरून वाढला असताना, जून २०१५ तिमाहीअखेर रेलिगेअर इन्व्हेस्कोच्या गंगाजळीने १९,५१८ कोटींवर घसरणही दाखविली आहे.
इन्व्हेस्कोला १०० टक्के मालकी सोपविणारा करार झाल्याचे रेलिगेअरने प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी स्पष्ट केले. तथापि, यामागील आर्थिक व्यवहाराची कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही. इन्व्हेस्कोने मार्च २०१३ मध्ये ४९ टक्के भांडवली सहभागासह ही संयुक्त कंपनी सुरू झाली. भारतीय बाजारपेठेवर आणि कंपनीच्या व्यावसायिक वृद्धीबाबत पूर्णपणे खात्री बाळगत, अधिक खोलवर विस्तार साधण्याची ही संधी असल्याचे इन्व्हेस्कोचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आणि आशियाई व्यवसायाचे प्रमुख अँड्रयू लो यांनी विश्वास व्यक्त केला.