सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे. बँकेच्या बचत खात्यांतून लवकरच अधिक रक्कम काढता येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बचत खात्यातील रक्कम काढण्यावरील मर्यादा लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेतून पैसे काढण्यावर घातलेल्या मर्यादा रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही क्षणी हटवली जाण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्याच्या नियमानुसार, बँकेच्या बचत खात्यातून आठवड्याला फक्त २४ हजार रुपये काढता येणार आहेत. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सुरुवातीला २००० आणि त्यानंतर ४००० रुपये दिवसाला काढता येतील, असा नियम जाहीर केला होता. तसेच एका आठवड्यात बँकेतून २४ हजार रुपये काढता येतील, असाही नियम लागू केला होता. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यावरील मर्यादेत वाढ करून दिवसाला १० हजार रुपये काढण्याची सूट दिली होती. मात्र, आठवड्याला फक्त २४ हजार रुपयेच काढता
येतील, हा नियम कायम ठेवला होता.

गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने १ फेब्रुवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा हटवली होती. त्यानुसार बचत खाते असलेले ग्राहक एटीएममधून एकावेळी २४ हजार रुपयेही काढू शकतात, असा नियम लागू केला होता. पण एटीएममधून आठवड्याला २४ हजार रुपयेच काढता येतील, हा नियम कायम ठेवला होता. दरम्यान, चलनातून रद्द करण्यात आलेल्या जुन्या नोटांच्या मूल्याइतक्याच नव्या नोटा चलनात आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहितीही शक्तिकांता दास यांनी यावेळी दिली. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना नोटाबंदीमुळे होणारा त्रास लवकरच संपेल, असे सांगितले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी शक्तिकांत दास यांनी बँकेतून पैसे काढण्यावरील मर्यादा लवकरच हटवली जाणार असल्याचे सांगून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.