करोना आजारसाथीने कुटिराघात केलेली अर्थव्यवस्था लवकरच पुन्हा उसळी घेताना दिसेल. तसे संकेत देणारे हिरवे कोंब फुटलेलेही दिसत आहे, असे प्रतिपादन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी येथे मंगळवारी केले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदीचे अर्थव्यवस्थेला भीषण परिणाम सोसावे लागले असून, सरकारला अर्थव्यवस्थेला चालना आणि उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन म्हणून अनेकांगी उपाययोजना जाहीर कराव्या लागल्या आहेत. ‘अर्थव्यवस्था पुन्हा मुसंडी घेईल आणि मोठय़ा त्वेषाने उसळेल, अशी माझी दृढ धारणा आहे. अनेक क्षेत्रांत हिरवे कोंब फुटताना दिसत आहेत, तर ग्राहकोपयोगी उत्पादने यासारख्या क्षेत्राने फेरउभारीही दाखविली आहे,’ असे कांत म्हणाले. ‘फिक्की फ्रेम्स २०२०’ परिषदेपुढे बोलताना त्यांनी हे विधान केले.

करोनाची साथ ही केवळ भारतासाठी नव्हे, तर अमेरिका आणि युरोपीय देशांसह संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक ठरली आहे, असे नमूद करीत कांत म्हणाले, ‘प्रत्येक संकट हे एक संधीदेखील असते. या संकटातूनही एकीकडे पराभूत झालेले मोठय़ा प्रमाणावर दिसतील, तसेच विजेतेही असणार आहेत. आपण पराभूतांमध्ये सामील होणार की, विजेते बनणार हा निर्णय भारतानेच घ्यायचा आहे.’

निवडक १२ ते १३ उद्योग क्षेत्र निश्चित करून, उद्याचे विजेते असलेल्या या क्षेत्रांवर भारताने लक्ष केंद्रित करायला हवे, असे कांत यांनी सांगितले. डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जेनॉमिक्स, मोबिलिटी आणि सर्जनशीलता असणाऱ्या उद्योगांचा त्यांनी या संबंधाने उल्लेख केला. आत्मनिर्भर भारत मोहीम ही जागतिकीकरणाविरोधी अथवा अलिप्तततावादाची कास धरणारी नाही, असेही त्यांनी सांगितले.