देशभरात १०० शीतगृह भांडार उभारण्याची अन्न प्रक्रिया उद्योगमंत्र्यांची घोषणा

मल्टी ब्रॅण्ड रिटेलला विरोध करणाऱ्या भाजपप्रणीत सरकारमधील अन्न प्रक्रिया उद्योग हाताळणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी अन्न प्रक्रिया उद्योगात १०० टक्क्यांपर्यंतच्या थेट विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीची मागणी केली आहे. खात्याच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी देशभरात नवीन १०० शीतगृह भांडार उभारण्याची घोषणाही केली. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला ई मंचावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत २३ राज्यांनी सहमती दर्शविल्याचे स्पष्ट करत ही व्यवस्थाही लवकरच वेग पकडेल, असे त्या म्हणाल्या.

केंद्रीय मंत्र्यांनी ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनातील चर्चासत्रात भाग घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, मल्टी ब्रॅण्ड रिटेलला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा असलेला विरोध कायम असून केवळ कृषी व अन्न प्रक्रियेशी संबंधित क्षेत्रात १०० टक्क्यांपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा करण्यास काहीच हरकत नाही.

सरकारने प्रस्तावित केलेली ४२ अन्न उद्याने ही देशातील अन्न प्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय ठरतील, असे नमूद करत नवीन १०० शीतगृह भांडार देशभरात वर्षभरात सुरू करण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. १३८ शीतगृह भांडार उभारणीचे सरकारचे नजीकच्या कालावधीतील लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

अन्न प्रक्रिया क्षेत्र देशातील सकल राष्ट्रीय उत्पादनात ११, तर निर्मिती क्षेत्रात ९ टक्के हिस्सा राखतात; खाद्यान्नाबाबत देश उत्पादन, मागणी आणि निर्यातीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे, अशी आकडेवारी देत केवळ भारतच नव्हे, तर विकसित राष्ट्रांमध्येही वाया जाणाऱ्या कृषी व अन्नपदार्थाचे प्रमाण हे ३० टक्के असून ते कमी करण्यासाठी अन्न प्रक्रिया व साठवणूक क्षेत्रात १०० टक्क्यांपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध राज्यांमध्ये असलेल्या कृषी बाजार समितीच्या कायद्याचे अस्तित्व राखून ई-मंचावर शेतकऱ्यांना थेट त्यांच्या कृषिमालाची विक्री करता येईल, असेही त्या म्हणाल्या.