संचालक मंडळ बैठकीचा इतिवृत्तान्तही सार्वजनिक होणार!

मुंबई : मध्यवर्ती बँकेच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकतेत वाढ आणि माहिती अधिकार कायद्याखाली अशा प्रकारची माहिती विचारली जाण्याची गरज राहू नये, यासाठी येथून पुढे रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या बैठकांचे इतिवृत्तान्तही सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ पतधोरण निर्धारण समिती (एमपीसी) बैठकांचे इतिवृत्तान्त रिझव्‍‌र्ह बँकेकडून सार्वजनिक केले जात आहे.

या पारदर्शी पायंडय़ाची सुरुवात म्हणून गत वर्षी ऑक्टोबरमध्ये चंडीगड येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्तान्त आंशिक रूपात रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी सायंकाळी संकेतस्थळावर प्रसिद्धही केले आहेत. या संबंधाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, कारभारात पारदर्शकता वाढविण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू असून, त्या दिशेने पडलेले हे पाऊल असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

भविष्यातही मध्यवर्ती संचालक मंडळाच्या पुढील बैठकीची तारीख निश्चित झाल्याच्या दोन आठवडय़ांच्या कालावधीत, आधीच्या बैठकीचे इतिवृत्तान्त संकेतस्थळावर नियमितपणे प्रसिद्ध केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार, देशाच्या वित्तीय क्षेत्राच्या समस्येचा विशेषत: वाणिज्य तसेच नागरी सहकारी बँकांसह, बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या नियामक आणि पर्यवेक्षीय आकृतीबंधाबाबत संचालकांनी विस्ताराने चर्चा केली. या ५७९ व्या बैठकीत, अन्य अनेक मुद्दय़ांसह मध्यवर्ती संचालकांना तसेच स्थानिक संचालक मंडळाच्या सदस्यांना देय बैठक भत्त्याचा मुद्दाही चर्चेला आला होता.