अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गव्हर्नरांची तयारी; एप्रिलमधील पतधोरणातून निर्णयाची शक्यता

मुंबई : करोना विषाणूच्या प्रसारामुळे ठप्प पडत असलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून रिझव्‍‌र्ह बँक कर्जाचे व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे.

मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत सोमवारी सुतोवाच केले. अर्थव्यवस्थेत पुरेशी रोकड उपलब्ध होण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक निश्चितच कोणत्याही क्षणी प्रयत्न करेल, असे दास म्हणाले.

रिझव्‍‌र्ह बँकेचे नव्या आर्थिक वर्षांचे पहिलेच द्विमासिक पतधोरण येत्या ३ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता.

अमेरिकेने आठवडय़ात दुसऱ्यांदा व्याजदर कमी करताना ते २००८ मधील दुसऱ्या जागतिक मंदी कालावधीसमकक्ष आणून ठेवले. भारतातील रिझव्‍‌र्ह बँकही असेच काहीसे पाऊल उचलेल या धास्तीनेही बाजारात समभाग विक्रीदबाव वाढला.