निश्चलनीकरणाची अर्थव्यवस्थेला फटका बसल्याची कबुली

सार्वत्रिक अपेक्षांच्या विपरीत व्याजदरात जैसे थे ठेवणारे पतधोरण

निश्चलनीकरणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल याची रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी कबुली देताना, देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन चालू आर्थिक वर्षांत ७.१ टक्के असेल, असे अंदाजले आहे. २०१६-१७ सालासाठी यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने ७.६ टक्क्य़ांचा विकास दर अंदाजला होता, तो बदललेल्या परिस्थितीत अर्धा टक्क्य़ांनी खालावला आहे.

अल्प कालावधीसाठी अर्थव्यवस्था विस्कळीत होण्यासह, निश्चलनीकरणामुळे घटलेल्या एकंदर मागणीचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी पतधोरणापश्चात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनांत नमूद केले आहे. निश्चलनीकरणाचा रोखीने होणाऱ्या व्यवहार होणाऱ्या उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे चालू आर्थिक वर्षांतील चौथे द्विमासिक पतधोरण गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी बुधवारी जाहीर केले. यासाठीची पतधोरण समितीची बैठक मंगळवारपासून सुरू होती. या बैठकीतून व्याजदर कपातीची सार्वत्रिक अपेक्षा केली जात होती. तथापि व्याजदर आहे त्या पातळीवर राखण्याच्या बाजूने समितीतील सर्व सहाही सदस्यांनी एकमताने कौल दिल्याचे स्पष्ट करण्यात आले.

चालू आर्थिक वर्षांसाठी विकास दर ७.१ टक्के तर महागाई दर मार्च २०१७ अखेर ५ टक्के अंदाजताना रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर ६.२५ टक्के असा स्थिर ठेवला. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या येत्या आठवडय़ातील पतधोरणामुळे तूर्त दर कमी अथवा अधिक करण्यात येत नसल्याचेही गव्हर्नरांनी स्पष्ट केले. सध्याची औद्योगिक क्षेत्रातील मंदीही विकास दराचा अदाज कमीकरण्यास कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.

निश्चलनीकरणामुळे वस्तूंची मागणी घटल्याने डिसेंबर २०१६ अखेपर्यंत महागाई दर ०.१० ते ०.१५ टक्क्याने कमी होईल. तथापि मार्च २०१७ अखेर महागाई दर ५ टक्क्यांच्या पातळीपर्यंत जाईल असेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षिले आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाचा परिणाम अद्याप अर्थव्यवस्थेवर उमटला नसून ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानच्या तिमाहीनंतरच कृषी उत्पादन, विकास दरवाढ दृष्टिक्षेपात असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बँकांसाठीच्या रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) करण्यात आलेली वाढ १० डिसेंबरपासून माघारी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. निश्चलनीकरणानंतर बँकांकडे जमा झालेली अतिरिक्त रोकड तरलता शोषून घेण्यासाठी मध्यवर्ती बँकेने हे पाऊल टाकले होते. ते मागे घेऊन १० डिसेंबरनंतर पूर्वीच्या पातळीवर आणले जाणार आहे.  रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण ८ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

भांडवली बाजाराची निराशेने घसरण

मुंबई : स्थिर व्याजदर ठेवण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या आश्चर्यकारक निर्णयाने भांडवली बाजाराचीही निराशा झाली. पतधोरण जाहीर होण्यापूर्वी  वरच्या टप्प्यावर पोहोचलेले प्रमुख निर्देशांक दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत अध्र्या टक्क्यापर्यंत घसरले.

सेन्सेक्स १५५.८९ अंश घसरणीसह २६,२३६.८७ पर्यंत खाली आला, तर ४१.१० अंश घसरणीमुळे निफ्टी ८,१०२.०५ वर स्थिरावला. सकाळच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २६,५४०.८३ व ८,१९०.४५ पर्यंतच वधारले होते.  अर्धा टक्क्य़ांपर्यंत व्याजदर कपातीच्या आशेने गेल्या सलग दोन व्यवहारांत मुंबई निर्देशांकाने १६२ अंश वाढ नोंदविली होती. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी त्यांच्या कारकीर्दीतील दुसऱ्या पतधोरणात रेपो दर स्थिर ठेवले. याचे विपरीत सावट प्रामुख्याने बँक समभागांवर उमटता दिसले.