रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक सुरू

रिझव्‍‌र्ह बँकेच्या जून महिन्यात झालेल्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने मुख्य कृषी उत्पादनांच्या आधारभूत किंमतीत केलेली वाढ आणि इंधनाच्या किंमतीत होत असलेल्या वाढीमुळे महागाईच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेचा विचार करून रिझव्‍‌र्ह बँक यंदा व्याजदर वाढीचा निर्णय घेईल, असा अर्थजगताचा कयास आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठी पतधोरणाचा आढावा घेण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण आढावा समितीच्या बैठकीला सोमवारपासून मुंबईत प्रारंभ झाला. तीन दिवस चालणऱ्या या बैठकीत देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ते उपाय केले जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय समितीचे पतधोरण समितीचे अध्यक्ष व गव्हर्नर ऊर्जित पटेल हे बुधवारी, १ ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहेत.

देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात अद्याप सुधारणा होताना दिसत नाही. भांडवली वस्तुच्या उत्पादन वाढीला खीळ बसली आहे. नवीन प्रकल्प सुरू होण्याचा वेग मंदावलेला आहे. या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समिती लगेचच दरवाढ न करता डिसेंबरच्या बैठकीपर्यंत थांबून उपलब्ध आकडेवारीनुसार दरवाढ करण्याचा निर्णय घेईल, असे मात्र ‘केअर रेटिंग’च्या अर्थतज्ज्ञ कविता चको यांनी ‘लोकसत्ते’ला सांगितले.

२०१८-१९ मधील यंदाचे तिसरे द्विमासिक पतधोरण आहे. यापूर्वीच्या पतधोरणात मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवित ६.२५ टक्के केला होता. खनिज तेलाच्या गेल्या तीन वर्षांतील वाढत्या दरांनी सध्या उसंत घेतली असली तरी देशांतर्गत महागाई वाढीचे संकट अद्यापही कायम आहे.    त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे प्रतिक असलेल्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेगही सध्या मंदावलेल्या स्थितीतच आहे.

व्याजदर वाढीस कारण की..

१. येत्या आठवडय़ात प्रमुख जगातील बँक ऑफ जपान अमेरिकच्या फेडरल रिझव्‍‌र्ह आणि बँक ऑफ इग्लंड यांची त्या त्या अर्थव्यवस्थांचा आढावा घेऊन उपाय योजना करण्याबाबतची बैठक होणार असून या बैठकींची छाया रिझव्‍‌र्ह बँकेच्या यंदाच्या पतधोरण आढावा बैठकीवर असेल. जानेवारी महिन्यात किरकोळ किंमतीवर आधारित महागाईचा दर १.४६ टक्यांवरून जून महिन्यात ५ टक्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यात महागाईचा दर ४.८७ टक्के होता.

२. केंद्र सरकार पाठोपाठ काही राज्ये कृषी उत्पादनांच्या हमी भावात वाढ करण्याची शक्यता आहे. देशाच्या पश्चिमेकडील राज्यात पुरेसा पाऊस झाला असला तरी २० जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार पूर्वेकडील राज्ये उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने मागील वर्षांच्या तुलनेत खरिपाच्या पेरणीत २० टक्के घट झाली आहे. देशाचा विचार करता मागील वर्षांच्या तुलनेत खरिपाच्या पेरणीत ४% घट झाल्याचे दिसते.

सोमवारपासून सुरू झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समिती बैठकीत कमकुवत रु पया आणि अर्थव्यवस्थेसमोरचा चलनवाढीचा धोका लक्षात घेऊन रेपो दरात पाव टक्कय़ांची वाढ होण्याची शक्यता आहे.     समीर नारंग, महाव्यवस्थापक आणि मुख्य अर्थ सल्लागार, बँक ऑफ बडोदा.

यंदाच्या पतधोरणात मध्यवर्ती बँक पाव टक्का दरवाढ करण्याचा आमचा अंदाज आहे. याकरिता एक कारण म्हणजे गेल्या काही कालावधीपासून महागाई दर हा ४ टक्क्य़ांच्या वर राहिला आहे. तसेच मुख्य महागाईचा देखील वरचा प्रवास सध्या सुरू आहे. वाढीव हमीभावामुळे अन्नधान्याच्या महागाईबाबतची जोखीम वाढणारी आहे. त्याचबरोबर वाढीव विकासाचे आव्हानही कायम आहेच. सुवोदीप रक्षित, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, कोटक इन्स्टिटय़ुट इक्विटीज.