रिझव्‍‌र्ह बँकेचे आज पतधोरण

रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदर  निर्धारण पतधोरण समितीची बैठक बुधवारी संपत असून नेमका निर्णय दुपापर्यंत जाहीर होणार आहे. महागाई सावरत असल्याने यंदा व्याजदर कपात अथवा त्यात कोणताही फेरबदल होण्याची शक्यता कमीच असल्याचा विश्लेषकांचा कयास आहे.

गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली. बुधवारी ती संपणार असून दुपापर्यंत व्याजदर बदलाबाबतचा निर्णय जाहीर होणार आहे.

गेल्या पतधोरणातही मध्यवर्ती बँकेने तिच्या द्विमासिक पतधोरणात दर स्थिर ठेवले होते. सध्या रेपो दर ६.५ टक्के आहे. खनिज तेलाच्या किमती तूर्त सावरल्या आहेत. तसेच किरकोळ महागाई निर्देशांकही ४ टक्क्यांच्या आतच आहे. मात्र शुक्रवारीच जाहीर झालेला चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील ७.१ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन दर चिंताजनक आहे.

दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारी रोख्यांच्या खरेदीमार्फत अर्थव्यवस्थेत १०,००० कोटी रुपये येत्या गुरुवारी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केल्याने रोखीची चणचण नसल्याचे मानले जाते. परिणामी प्रमुख दरांमध्ये कपात करून व्यापारी बँकांना अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची शक्यताही मावळली आहे.