20 February 2019

News Flash

वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठण्यात राज्यांना अडचण

कर्जमाफी आणि जीएसटी निमित्त ठरणार - रिझव्‍‌र्ह बँक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (संग्रहित छायाचित्र)

कर्जमाफी आणि जीएसटी निमित्त ठरणार – रिझव्‍‌र्ह बँक

चालू वित्त वर्षांत विविध राज्यांना त्यांच्या वित्तीय तुटीचे उद्दीष्ट गाठण्यात अपयश येण्याबाबतची भीती रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केली आहे. राज्यांमार्फत जाहीर केली जाणारी कर्जमाफी आणि कमी वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन हे यासाठी निमित्त ठरणार असल्याचे भाकित वर्तविले आहे.

विविध राज्यांच्या आर्थिक ताळेबंदाच्या आधारावर रिझव्‍‌र्ह बँकेने हा निष्कर्ष काढला आहे. २०१७-१८ मध्ये राज्यांच्या वित्तीय तुटीचे लक्ष्य ३.१ टक्के होते. यंदा मात्र सलग तिसऱ्यांना राज्यांना वाढत्या वित्तीय तुटीला सामोरे जावे लागले, असेही नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह सात राज्यांनी आतापर्यंत कृषी कर्जमाफी जाहीर केली आहे. तसेच नव्या अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे राज्यांचा महसुली वाटा कमी होत आहे. ही राज्यांसाठी चिंतेची बाब असल्याचे नमूद करत रिझव्‍‌र्ह बँकेने राज्यांबाबतच्या अहवालात परिणामी वित्तीय तुटीचे उद्दीष्ट विस्तारले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या तुलनेत कृषी कर्जमाफी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात ०.३२ टक्क्य़ांवर पोहोचल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. कर्जमाफी जाहीर करणाऱ्या राज्यांच्या भांडवली खर्चातही घसरण होत असल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. काही राज्यांनी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी राज्यांना अधिक खर्च करावा लागणार असल्याचेही नमूद करण्यात आले.

First Published on July 13, 2018 1:25 am

Web Title: reserve bank of india gst