देश विदेशातील परिस्थितीचा साकल्याने आढावा घेता रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर स्थिरच ठेवेल अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यासाठी पुढे करण्यात आलेली कारणे अशी..
पावसाबाबत अनिश्चितता कायम
जुल महिन्यात ५० वर्षांच्या सरासरी सापेक्ष देशात ८० टक्के पर्जन्यमान झाले. रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिल व जून महिन्यात जाहीर केलेल्या पत धोरणात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यास अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्या देशात राजस्थान, गुजरात, ओडिशा या राज्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला. गुजरातमध्ये नद्यांना पूर आल्यामुळे जीवितहानी झाली व ओल्या दुष्काळाचे सावट आहे. तर महाराष्ट्रातील मराठवाडा-विदर्भातील काही भाग, कर्नाटकातील काही जिल्हे, आंध्र प्रदेश तेलंगणाच्या काही भागात पाऊस दीर्घकालीन सरसरीपेक्षा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची वानवा भासेल अशी परिस्थिती आहे.
महागाईवाढीची जोखीम
पावसाच्या अनियमिततेच्या पाश्र्वभूमीवर जून महिन्याचा ग्राहक किमतींवर आधारित महागाई निर्देशांकात ५.४ टक्क्याची वार्षकि वाढ होऊन निर्देशांक आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला. या वाढीस प्रामुख्याने अन्नधान्य, इंधन यांच्या वाढलेल्या किमती कारणीभूत ठरल्या. केंद्र सरकारचे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय नव्याने ग्रामीण व नागरी भागातील ग्राहक किमतींवर आधारित महागाईचा निर्देशांक जाहीर करत आहे. जून महिन्यात ग्राहक किमतींवर आधारित महागाईच्या नागरी निर्देशांकात ४.५५ टक्के, तर ग्रामीण भागातील ग्राहक किमतींवर आधारित महागाई निर्देशांकात ६.०७ टक्के वाढ झाली. रिझव्‍‌र्ह बँकेने जून महिन्यात या वर्षांतील तिसरी रेपो दर कपात करून भविष्यात दर कपातीचा निर्णय हा महागाईच्या निर्देशांकावर ठरेल असे स्पष्ट केले होते. तथापि जून-जुल महिन्यात महागाई वाढण्याचा मागील पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आहे.
‘फेड’चा संभाव्य भीमटोला
अमेरिकेची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा लवकर सुधारत असल्याचे संकेत मिळत असल्याने, तेथील मध्यवर्ती बँक- फेडच्या आगामी १६ व १७ सप्टेंबर रोजी होत असलेल्या बठकीत बहु प्रलंबित व्याजदर वाढ केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच निर्यात कमी होत असताना सोन्याच्या आयातीमुळे परकीय व्यापारातील तूट वाढून अर्थव्यवस्थेत असंतुलन निर्माण झाले आहे.

व्याजदर कपातीच्या शक्यतेकडे झुकणारे घटक
*  जागतिक घडामोडींचे प्रतिकूल आघात सुरू असताना, देशांतर्गत परकीय चलन गंगाजळीने त्या आघातांपासून बचावाची अर्थव्यवस्थेला प्रदान केलेली सक्षमता.
* कच्चे तेल, सोने, धातू या जिनसांचे घसरत असलेले भाव आणि त्यांचा देशांतर्गत भाववाढीला पायबंद घालणारा दिलासा.
* आर्थिक सुधारणांबाबत सरकारचा कडवा निग्रह आणि पाठपुरावा.
* पाऊस तुटीचा असला तरी त्याबाबत पूर्वअंदाजित जोखीम ही बव्हंशी ओसरली आहे. किंबहुना सरासरीपेक्षा तुटीच्या पावसाबाबत ताजे अनुमान हे सात टक्क्य़ांचे जे गेल्या वर्षांतील १३ टक्क्य़ांच्या तुटीपेक्षा निश्चितच सरस आहे.
* ‘फेड’चा निर्णय येण्याआधी, त्याच्या बऱ्यावाईट परिणामांपासून संरक्षक आणि देशांतर्गत विदेशी गुंतवणुकीचा दर कायम राखू शकेल, असे पहिले पाऊल टाकणारी आघाडी मिळविणे.